डोंबिवलीमध्ये घुमला ढोलताशांचा आवाज; महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटकमधील १३ पथकांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 01:39 AM2020-02-03T01:39:14+5:302020-02-03T01:39:41+5:30
आरंभ प्रतिष्ठानतर्फे तालसंग्राम २०२० या राज्यस्तरीय ढोलताशा स्पर्धेला शनिवारी सावळाराम क्रीडासंकुलाच्या पटांगणात सुरुवात झाली.
डोंबिवली : आरंभ प्रतिष्ठानतर्फे तालसंग्राम २०२० या राज्यस्तरीय ढोलताशा स्पर्धेला शनिवारी सावळाराम क्रीडासंकुलाच्या पटांगणात सुरुवात झाली. केडीएमसीच्या महापौर विनीता राणे, भारतीय सैनिकी स्कूलच्या संचालिका राजेश्वरी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन पार पडले. यंदा या स्पर्धेसाठी अंमळनेर, फलटण, नाशिक, ठाणे, मुंबई, कोकण भागांसह गोवा आणि कर्नाटक या राज्यांतून येऊन १३ पथकांनी आपली कला सादर केली.
नाशिकचे तालरुद्र, बेळगावचे धाडस, अंमळनेरचे नादब्रह्म, फलटणचे शिवरुद्र तसेच मावळे आम्ही ढोलताशांचे, छावा, शिवस्वरूप, मावळे, आम्ही कांदिवलीकर, पार्लेस्वर, बदलापूरचे शिवसूत्र, जगदंब, नादब्रह्म आदी पथकांचा समावेश होता. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक दीड लाख, द्वितीय एक लाख, तृतीय ५० हजार आणि उत्कृष्ट ताशा, ढोल, ध्वज, टोलवादकांसाठी प्रत्येकी १० हजार रुपये अशी बक्षिसे असल्याचे आयोजकांनी सांगितले. त्यासोबत आकर्षक ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन सन्मान होणार आहे. या स्पर्धेला राज्य शासनाच्या विशेष निधीअंतर्गत सहकार्य मिळाले आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ पुण्याचे रहिवासी सुजित सोमण, गणेश गुंड-पाटील, निलेश कांबळे आदी परीक्षक होते.
तालसंग्रामची भरारी अशीच उत्तुंग होवो, अशा शब्दांत महापौर राणे यांनी, तर राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजनामध्ये भारतीय सैनिकी स्कूलच्या कॅडेट्सना राष्ट्रासाठी काही क्षण या संकल्पनेंतर्गत सहभागी होता आले, याचा आनंद असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले. त्यावेळी व्यासपीठावर नगरसेविका ज्योती राजन मराठे, प्रमिला चौधरी, मुकुंद पेडणेकर, साई शेलार, माजी नगरसेवक श्रीकर चौधरी, कॅप्टन सुदीप मिश्रा, भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे आदी उपस्थित होते. महापालिका उपायुक्त मिलिंद धाट, प्रसाद ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील आदींनीही स्पर्धेला मार्गदर्शन केले. आमदार रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, आमदार जगन्नाथ शिंदे, दीपेश म्हात्रे, महापालिका प्रशासन आदींनी सहकार्य केले.