बालनाट्य महोत्सवात ‘डराव डराव’चाच आवाज!
By admin | Published: December 28, 2015 02:35 AM2015-12-28T02:35:34+5:302015-12-28T02:35:34+5:30
बेडकांची व्यथा मांडणाऱ्या ज्ञानदीप कलामंचच्या ‘डराव डराव’ या नाटकाने उत्कृष्ट कलाकृती सादर करीत ठाण्यात संपन्न झालेल्या बालनाट्य महोत्सवात बाजी मारली.
ठाणे : बेडकांची व्यथा मांडणाऱ्या ज्ञानदीप कलामंचच्या ‘डराव डराव’ या नाटकाने उत्कृष्ट कलाकृती सादर करीत ठाण्यात संपन्न झालेल्या बालनाट्य महोत्सवात बाजी मारली. द्वितीय पारितोषिक पटकाविणाऱ्या समता विचार प्रसारक मंडळाच्या ‘श्रद्धा-अंधश्रद्धा’ नाटकाने उपस्थित रसिकांची मने जिंकली.
ठामपाच्या वतीने नाताळाच्या सुटीमध्ये आयोजित केलेला बालनाट्य महोत्सव उत्साहात संपन्न झाला. गडकरी रंगायतन येथे तीन दिवस सुरू असलेल्या या महोत्सवाचा समारोप रविवारी झाला. या महोत्सवात तृतीय क्रमांक जिज्ञासा ट्रस्टच्या ‘आम्ही सारे छोटे न्यूटन’ व उत्तेजनार्थ म्हणून ‘किलबिल पाखरांची चिलबिल शाळा’ या नाटकांना गौरविण्यात आले. तीनदिवसीय महोत्सवात एकूण ११ नाटके सादर झाली. महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी संकेत तटकरे लिखित व दिग्दर्शित खफूआ-खडा फुटणार आहे, समता विचार प्रसारक मंडळाच्या कल्पना म्हात्रे लिखित, अश्विनी मोहिते दिग्दर्शित बालसुधारगृह, अनुजा व अंजली लोहार लिखित व दिग्दर्शित टपाल-एक हरवलेले पत्र आदी नाटके सादर झाली. या वेळी क्र ीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती संभाजी पंडित व नौपाडा प्रभाग समिती अध्यक्ष हिराकांत फर्डे यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले. रंगकर्मी क्षितिज कुलकर्णी व मानसी राणे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.