काँग्रेसचे शहर अध्यक्षपद मिळविण्यासाठी दीड कोटीची दक्षिणा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:27 AM2021-06-25T04:27:55+5:302021-06-25T04:27:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जवळ येऊ लागल्याने काँग्रेस शहर अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जवळ येऊ लागल्याने काँग्रेस शहर अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. ठाण्यातील एका पदाधिकाऱ्याने अध्यक्षपदाची स्वप्ने पडू लागल्याने काँग्रेसच्या टिळक भवनसाठी दीड कोटी रुपये दिल्याची चर्चा ठाण्यातील राजकीय वर्तुळात रंगली आहे.
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात ‘एकला चलो रे’ चा नारा दिला. ठाण्यात आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षबांधणीला सुरुवात झाली आहे. आजी-माजी मंत्र्यांची ठाण्यात ये-जा सुरू झाली. काँग्रेसचे अस्तित्व दिसण्यासाठी आंदोलनाद्वारे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला जात आहे. एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या ठाणे जिल्ह्यात आताच्या घडीला काँग्रेसला अस्तित्व राखण्यासाठी झगडावे लागत आहे.
सध्या ठाण्यात काँग्रेसचे केवळ तीन नगरसेवक आहेत. काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता त्यांना हटवून दुसरा शहर अध्यक्ष बसविण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. निवडणुका काही महिन्यांवर आल्या असताना शहर अध्यक्ष बदलल्यास ते काँग्रेसच्या फायद्याचे ठरणार नसल्याचे बोलले जात आहे. परंतु संघटनेत जान फुंकण्याकरिता बदल अपरिहार्य असल्याचे काहींचे मत असून काहींना शहर अध्यक्षपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामुळे एका बड्या पदाधिकाऱ्याने शहर अध्यक्षपद मिळावे यासाठी टिळक भवनसाठी दीड कोटींचा खर्च केल्याची माहिती सर्वदूर पसरली आहे. हा पदाधिकारी मूळचा काँग्रेसचा नसून यापूर्वी भाजपमध्ये पदाधिकारी होता. भाजपमध्ये असतानाही त्याला शहर अध्यक्षपदाची स्वप्ने पडली होती. तसेच आमदारकीचे तिकीट मिळेल, असेही त्याला वाटत होते. परंतु दोन्ही स्वप्ने भाजपमध्ये अपूर्ण राहिल्याने त्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
........
वाचली