‘रिव्हर व्ह्यू’ फ्लॅट २० लाखांत, पण...; बदलापूरमध्ये आक्रोश तीव्र होण्याचे एक सबळ कारण

By पंकज पाटील | Published: August 25, 2024 08:30 AM2024-08-25T08:30:43+5:302024-08-25T08:31:05+5:30

पुराचा फटका बसलेल्या अनेक कुटुंबीयांनी बदलापूर शहर सोडून देण्याचा निर्णय घेतला. 

special artical River view flat in 20 lakhs in badlapur flood update | ‘रिव्हर व्ह्यू’ फ्लॅट २० लाखांत, पण...; बदलापूरमध्ये आक्रोश तीव्र होण्याचे एक सबळ कारण

‘रिव्हर व्ह्यू’ फ्लॅट २० लाखांत, पण...; बदलापूरमध्ये आक्रोश तीव्र होण्याचे एक सबळ कारण

पंकज पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क|
बदलापूर : ‘अवघ्या २० ते २५ लाखांत निसर्गरम्य बदलापुरात रिव्हर व्ह्यू फ्लॅट’ अशा आकर्षक जाहिराती करून बिल्डरांनी उल्हास नदीच्या तीरावर वसवलेले बदलापूरमधील कॉम्प्लेक्स तासभर मुसळधार वृष्टी झाली की, पुराच्या पाण्यात बुडून जातात. अगदी पहिला मजला पाण्याखाली जाण्याइतकी भीषण परिस्थिती येथील मध्यमवर्गीय नागरिकांनी गेल्या काही वर्षांत सातत्याने पाहिली आहे. 
बदलापूरकर हे पुराने तर त्रस्त आहेतच पण नदीच्या पात्रालगतचे भूखंड विकले गेल्यावर व तेथे बांधकामे उभी राहिल्यावर पूर नियंत्रण रेषा निश्चित केल्याने काही भूखंडावरील बांधकामे थांबली आहेत. बदलापूरमध्ये आक्रोश तीव्र होण्याचे हे एक सबळ कारण आहे.

बदलापूर शहराचा विकास झाला तो उल्हास नदीच्या तीरावरच. मात्र गेल्या दहा वर्षांत शहराच्या बाह्य भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू झाल्यामुळे आता बदलापूरची लोकसंख्या झपाट्याने वाढली. रहिवाशांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. २६ जुलै २००५ च्या महापुरात बदलापूर शहराची दयनीय अवस्था झाली होती. त्यानंतर या बदलापूर शहरात घर घेण्यास कोणीही तयार होत नव्हते. एवढेच नव्हे तर पुराचा फटका बसलेल्या अनेक कुटुंबीयांनी बदलापूर शहर सोडून देण्याचा निर्णय घेतला. 

तीन ते चार वर्षे उलटल्यानंतर बिल्डरांनी पुन्हा उचल खाल्ली. बदलापूर शहराचा विकास सुरू झाला. उल्हास नदीच्या तीरावर पूर्वीपासून उभ्या राहिलेल्या इमारती आणि त्यामधील कुटुंबे आजही मुसळधार पाऊस पडू लागल्यावर दहशतीच्या वातावरणातच वावरत असतात. पावसाळा सुरू झाल्यावर अखंडित पाऊस पडू लागल्यावर पूर कधी दारात येईल याची शाश्वती बदलापूरकर देऊ शकत नाहीत.  प्रत्येक पावसाळ्यात पूर परिस्थितीचा सामना करायचा, घरातील फर्निचर, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान सहन करायचे अशी वेळ बदलापूरकरांना आली आहे.

ग्रामस्थांच्या नाराजीचे काय?
पुराचा फटका कमी बसावा यासाठी पूर नियंत्रण रेषा आखण्यात येते. मात्र बदलापूरची पूर नियंत्रण रेषा ही शहराचा विकास पूर्ण झाल्यानंतर आखण्यात आली. त्यामुळे काही इमारतींची कामे रखडली. तेथे घरे खरेदी केलेल्यांची पंचाईत झाली.

पूर नियंत्रण रेषेमुळे विकास खुंटला
उल्हास नदीची पूर नियंत्रण रेषा पाटबंधारे विभागाने निश्चित केली. मात्र ती नियंत्रण रेषा योग्य पद्धतीने आखण्यात आले नाही, असा दावा नागरिकांचा आहे. ज्या भागाला पुराचा धोका कधीच बसू शकत नाही तो भागदेखील पूर नियंत्रण रेषेच्या आत दाखवण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे.

शासकीय मदत मिळेना
उल्हास नदीला पूर आल्यानंतर ज्या नागरिकांची घरे आणि दुकाने पाण्याखाली येतात त्यांचे पंचनामे करूनही बाधितांना मदत मिळत नाही.

इमारतींचा पुनर्विकास थांबला
- नव्या पूर नियंत्रण रेषेमुळे उल्हास नदीच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास थांबला. 
- हा संपूर्ण परिसर पूर्ण नियंत्रण रेषेत दाखवण्यात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना धोकादायक इमारतीत राहण्याची वेळ आली. 

हेंद्रेपाडा हा भाग उल्हास नदीपासून जवळ असल्यामुळे जास्त पाऊस झाल्यास या भागातील अनेक घरे पाण्याखाली येतात. मात्र शासन स्तरावर त्यावर कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही.
    - सिद्धेश हरवटे, बदलापूर 

पूर नियंत्रण रेषा निश्चित करताना जागेवर न येताच परस्पर गुगल मॅपवरच ही रेषा निश्चित करण्यात आली. त्यामुळे टेकडीवरचा भागदेखील पूर नियंत्रण रेषेत दाखवण्यात आला. या पूर नियंत्रण रेषेचे  नव्याने सर्वेक्षण होणे गरजेचे आहे.
    - मयूर मेहेर, बदलापूर

हेही एक कारण
अनेकांचे संसार पाण्याखाली जातात तेव्हा प्रशासन दमडीही देत नाही. शासन, प्रशासनाच्या विरोधात संतापाची लाट उसळण्याचे हेही एक सबळ कारण आहे.

Web Title: special artical River view flat in 20 lakhs in badlapur flood update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.