ठाण्यात १८ हजार चौरस फुटांची महारांगोळी, पोट्रेट रांगोळी ठरणार विशेष आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 03:32 AM2018-03-15T03:32:56+5:302018-03-15T03:32:56+5:30
शेकडो कलाकारांसह तब्बल १८ हजार चौरस फुटांची पारंपरिक व अलंकारिक चिन्हे, प्रतीके, सुलेख यांचा संगम साधणारी भव्यदिव्य अशी रांगोळी यंदा गुढीपाडव्यानिमित्ताने गावदेवी मैदान येथे ठाणेकरांना पाहायला मिळणार आहे.
ठाणे : शेकडो कलाकारांसह तब्बल १८ हजार चौरस फुटांची पारंपरिक व अलंकारिक चिन्हे, प्रतीके, सुलेख यांचा संगम साधणारी भव्यदिव्य अशी रांगोळी यंदा गुढीपाडव्यानिमित्ताने गावदेवी मैदान येथे ठाणेकरांना पाहायला मिळणार आहे. ती रंगवल्ली परिवार अर्थात रंगरसिक ट्रस्टतर्फे रेखाटली जाणार आहे. रांगोळीमध्ये ‘अक्षर सुलेखन’ (कॅलिओग्राफी) हा एक अनोखा प्रयोग रसिकांना पाहायला मिळणार आहे.
गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधी म्हणजेच १६ मार्च रोजी १०० कलाकार आणि कार्यकर्ते ती रेखाटणार आहे. या सुलेखनातून उपनिषदांतील काही ठरावीक ‘शांतिमंत्र’ लिहिण्यात येणार आहेत. लौकिक सुखाकडून पारलौकिकतेकडे जाण्याचा मार्ग चितारण्याचा प्रयत्न त्यात करण्यात येणार आहे. पारंपरिक चिन्हांच्या जोडीला वळणदार नक्षीचा अंतर्भाव आकर्षक ठरणार आहे. या अभूतपूर्व सोहळ्याचे उद्घाटन १६ मार्च रोजी सायंकाळी ७ वा. होणार असून पुढील तीन दिवस म्हणजेच १९ मार्चपर्यंत रसिकांना या कलाविष्काराचा आनंद घेता येणार आहे.
तसेच व्यक्तिचित्र रांगोळ्यांचे प्रदर्शन १४ ते १९ मार्च पर्यंत सर्वांसाठी उपलब्ध आहे. १६ वर्षे अखंडपणे विविध उपक्रमांचे आयोजन करून अधिक व्यापक प्रमाणात समाजापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात असल्याचे आयोजक वेदव्यास कट्टी यांनी सांगितले.
कट्टी यांच्या संकल्पनेतून ही महारांगोळी साकारली जाणार आहे. सुलेखनाचा वेगळा प्रयोग यंदाही पाहायला मिळणार आहे. १६ मार्च रोजी सकाळी १० वाजता रांगोळी काढण्यास सुरुवात होईल. सायंकाळी ७ वा. रांगोळीचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. १५ वर्षांच्या कलाकारांपासून ते ८० वर्षांपर्यंतचे कलाकार सहभागी असतील. रंगांच्या १५ छटा, ९०० किलो रंग आणि ९०० किलो रांगोळी वापरली जाणार आहे.
>मैदानात काम सुरु
यंदाच्या वर्षी व्यक्तिचित्र रांगोळी म्हणजेच पोट्रेट रांगोळी हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरणार आहे. यात २० पोट्रेट काढली जाणार आहे. ती काढण्याचे काम सध्या गावदेवी मैदानात सुरू आहे. यात ठाण्याच्या खाद्यसंस्कृतीपासून राजकीय कारकीर्द गाजवणाऱ्या नेत्यांचा समावेश आहे.
ठाण्यातील खाद्यसंस्कृतीमध्ये मिसळ, वडापाव तसेच छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, त्याचप्रमाणे नूतन, श्रीदेवी यांचे पोट्रेटदेखील पाहायला मिळणार आहे. वसंत डावखरे यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचेदेखील पोट्रेट काढले जाणार असल्याचे कट्टी म्हणाले.