कोरोना नियम तोडणाऱ्यांविराेधात विशेष मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 12:49 AM2020-11-25T00:49:32+5:302020-11-25T00:50:06+5:30
७० टक्के मनपा शिक्षकांच्या चाचण्या पूर्ण : आयुक्तांची माहिती
ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोविडचा सामना करण्यासाठी ज्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे त्या सर्व सुविधा अद्ययावत ठेवण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व अधिकाऱ्यांना मंगळवारी दिल्या. शहरात मास्क न वापरणाऱ्या तसेच सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या नागरिकांविरोधात १० दिवसांत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
नागरी संशोधन केंद्र येथे महापालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या सुविधांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग कमी असला तरी बाधितांची संख्या अचानक वाढल्यास प्रशासनावर ताण येऊ नये, तसेच नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी आतापासूनच संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना करतानाच रुग्णवाहिका, ऑक्सिजनपुरवठा, ऑक्सिजन बेड, ॲन्टीजेन व आरटी-पीसीआर चाचण्या करणे, तसेच आवश्यक त्या औषधांचा योग्य तो साठा करून ठेवण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्तांनी आरोग्य विभागास आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केल्या.
व्यापक जनजागृती करण्याची सूचना
ठामपा शाळेतील ७० टक्के शिक्षकांच्या आरटी-पीसीआर चाचण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित चाचण्यातात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. येत्या काळात लसीकरण करण्यासाठी आरोग्यसेवकांची माहिती अद्ययावत ठेवण्याच्या सूचनादेखील त्यांनी आरोग्य विभागास केल्या. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरूच ठेवून कोरोना संसर्गबद्दल नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
लसीसाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सर्व्हे
ठाणे : कोरोना लस लवकरच उपलब्ध होणार असल्याने शहरातील सर्व वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा ७० टक्के सर्व्हे पूर्ण झाला असून पहिला लाभ त्यांना दिला जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली. दुसरी लाट येणार की नाही हे सांगणे कठीण असले तरी, ठाण्यातील कमी हाेणारी रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी भान राखले तर ठाण्यात दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.