विशेष मुलांनी बनवलेल्या गुढी पोहोचल्या अमेरिकेत
By प्रज्ञा म्हात्रे | Published: April 8, 2024 01:21 PM2024-04-08T13:21:14+5:302024-04-08T13:27:44+5:30
विश्वास गतिमंद केंद्रातील विशेष मुलांनी आपल्या क्लपकतेतून बनविलेल्या मिनी गुढींकडे अमेरिकेतील भारतीयांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
प्रज्ञा म्हात्रे, ठाणे: विश्वास गतिमंद केंद्रातील विशेष मुलांनी आपल्या क्लपकतेतून बनविलेल्या मिनी गुढींकडे अमेरिकेतील भारतीयांचे लक्ष वेधले असून या मिनी गुढी चक्क अमेरिकेत भेटवस्तू देण्यासाठी गेल्या आहेत. या विशेष मुलांच्या कला कौशल्यांचे ठाण्याबरोबर अमेरिकेतही कौतुक होत आहे. आठ मिनी गुढी या अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनी खरेदी केल्या आहेत.
सर्वसामान्य मुलांप्रमाणे विशेष मुलांच्या अंगी देखील कला कौशल्य दडलेले असते या कला कौशल्यांना वाव मिळावा आणि भविष्यात त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने विश्वास गतिमान केंद्र कडून विविध वस्तू बनवून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातात. गेली ३४ वर्षे संस्था सण - उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध वस्तू तयार करत असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याच्यानिमित्ताने या विशेष मुलांनी मिनी गुढी तयार केल्या आहेत.
लाल, निळा, हिरवा, भगवा, जांभळा, गुलाबी अशा विविध रंगांच्या खणाच्या कापडापासून तब्बल १०० मिनी गुढी मुलांनी तयार केल्या. या गुढींना सजवले ते
सोनेरी, मोती आणि गोंड्यांची माळ, चंदेरी रंगांचा गडू, नारळ, स्वस्तिक आदींनी. एक फुटांच्या या गुढी असून त्या अधिकच आकर्षक दिसत आहेत. या केंद्रातील २२ मुलांनी मुख्याध्यापिका मीना क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुढी तयार केल्या आहेत. मुलांच्या हाताला सवय झाली आहे त्यामुळे त्यांना एकदा सांगितले की, दुसऱ्या क्षणाला ते बनवायला घेतता. या मिनी गुढी बनविण्याचे यंदाचे हे ३४ वे वर्षे आहे. काळानुसार फक्त कापडात बदल होत गेला. या गुढी बनविताना मुलांच्या चेहऱ्यावर आनंद होता अशा भावना क्षीरसागर यांनी व्यक्त केल्या.
सर्वसामान्यांप्रमाणे खाजगी कंपन्यांनीही या गुढी खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. मिनी गुढीप्रमाणे खणांच्या या मुलांनी आपल्या ह्सतकलेतून तयार केलेल्या तोरणांनाही अधिक पसंती मिळाली आहे.