ठाण्यातील विशेष मुलांनी चित्रांद्वारे कोरोनविषयी केली जनजागृती
By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 19, 2020 03:56 PM2020-05-19T15:56:56+5:302020-05-19T16:00:22+5:30
घरीच रहा सुरक्षित रहा विशेष मुलांनी संदेश दिला आहे.
ठाणे : कोरोनविषयी विविध स्तरांवर जनजागृती होत असताना ठाण्यातील विशेष मुलांनीही कोरोनविषयी जनजागृती करून गो कोरोना गो चा संदेश दिला आहे तर नागरीकांनी घरातच रहा सुरक्षित रहा असेही आपल्या चित्रांद्वारे नागरिकांना सांगत आहेत.
विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट गेली 20 वर्षे विशेष मुलांसाठी काम करीत आहे. या शाळेत 18 ते 50 वयोगटातील 25 मुले मुली शिकत आहेत. सण - उत्सव आले की त्या अनुषंगाने ही मुले विविध वस्तू आपल्या कल्पकतेतून तयार करीत असतात . त्यांना मुख्यधापिका मीना क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभत असते. पर्यावरणस्नेही मखर, पिशव्या, राखी, कंदील अशा अनेक कलाकूसरीच्या वस्तू त्यांनी बनविल्या आहेत. लॉकडाऊनमुळे या मुलांची शाळा बंद असल्याने ते आपल्या पालकांसोबत घरीच आहेत. शाळेत एक दिवस सुट्टी असली तरी या मुलांना घरात करमत नाही परंतु दोन महिने ही मुले मोठ्या धीटाने घरी बसली आहे असे क्षीरसागर यांनी सांगितले. त्यांना घरात कंटाळा आला आहे, शाळेत यायचे आहे परंतु पालक, शिक्षक त्यांना का घरी बसावे लागते हे समजावून सांगत आहे. या मुलांचा वेळ जावा म्हणून ते पालकांना घरकामात मदत करतात. त्यात लादी पुसणे, एखादा पदार्थ बनविणे, केर काढणे, भाजी निवडणे याचबरोबर ते योगही करतात. मुख्याध्यापिका क्षीरसागर या त्यांना आठवड्यातून एकदा कोणती ना कोणती ऍक्टिव्हिटी देतात. विशेष म्हणजे ही मुले ती वेळेत पूर्ण करतात. यावेळेस मुलांना त्यांच्या मनात कोरोनविषयी काय आहे हे चित्रांतून व्यक्त व्हायला सांगितले होते. बातम्या पाहून त्यांना कल्पना होती की काय करावे, काय नाही. त्यामुळे या मुलांनी आपल्या पालकांच्या मदतीने कोरोनावर आधारित सुरेख चित्रे रेखाटली आहेत. ही मुले सांगू शकत नसले तरी चित्रातून व्यक्त झाल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. इतरांना सांगताना ते स्वतःला जागरूक करीत आहेत. मास्क घातलेला सुपरमॅन कोरोनाशी लढतोय, पृथ्वीला कोरोना या विषाणूने वेढले आहे, कोरोनाच्या संकट काळात काय करावे, काय करू नये, घरी सुरक्षित राहावे हे विविध विषय चित्रांद्वारे दाखविले आहे. त्यांनी ही चित्रे आपल्या लाडक्या बाईंना दाखवून कौतुकाची थाप ही मिळवली आहे.