अत्याचार प्रकरणातील उल्लेखनीय तपासाबद्दल उपाधीक्षक उमेश माने-पाटील यांना विशेष पदक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:46 AM2021-08-13T04:46:29+5:302021-08-13T04:46:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशभरातील १५२ पोलीस कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने विशेष पदक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशभरातील १५२ पोलीस कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने विशेष पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ११ अधिकारी असून, यात उपाधीक्षक उमेश शंकर माने-पाटील यांचाही समावेश आहे. सध्या कल्याण वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त असलेले माने-पाटील हे अकोल्यात उपविभागीय पोलीस अधिकारी असताना त्यांनी एका अत्याचार प्रकरणात केलेल्या तपासासाठी हे पदक जाहीर झाले आहे.
माने-पाटील हे मूळचे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील विसापूर गावचे रहिवासी आहेत. त्यांनी २०१६-१९ या कालावधीमध्ये अकोला शहर उपविभागीय अधिकारी म्हणून काम पाहिले. २०१९ साली त्यांना ठाणे एसीपी मुख्यालयाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर १२ नोव्हेंबर २०२० पासून ते कल्याण वाहतूक पोलीस विभागाचे सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. ते अकोला शहर येथे उपविभागीय अधिकारी असताना भीक मागणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केला होता. ही घटना २०१७ साली घडली होती. याचा तपास माने-पाटील यांच्याकडे होता. त्यांनी कसोशीने तपास करून तिघांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. साक्षी पुरावे तपासून न्यायालयाने २०२० साली तिघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात माने-पाटील यांनी उत्कृष्ट केलेल्या तपासाचा अहवाल गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. त्याबद्दल माने-पाटील यांना पदक जाहीर झाले असून, याबाबत सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
-----