ठाणे : शेठ लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृहात १८ पेट्यांचे विशेष नवजात केअर युनिट!
By जितेंद्र कालेकर | Published: March 28, 2023 04:57 PM2023-03-28T16:57:30+5:302023-03-28T16:57:59+5:30
वेळेआधी जन्म घेणाऱ्या व कमी वजनाच्या मुलांवर होणार तातडीने उपचार
ठाणे : महापालिकेच्या कोपरी येथील शेठ लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृहात चार स्त्रीरोग तज्ज्ञांच्या नियुक्तीसह १८ पेट्यांचे विशेष नवजात केअर युनिट (एनआयसीयू) उभारण्यास महापालिकेने मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे वेळेआधी जन्म घेणाऱ्या आणि कमी वजनाच्या मुलांवर तातडीने उपचार सुरू करता येणार आहेत. या प्रसूतिगृहात `एनआयसीयू'साठी भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण आणि भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्याकडून महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात येत होता.
कोपरी येथील हे प्रसूतिगृह सुरू करण्यासाठी चव्हाण यांनी विधान परिषदेचे तत्कालीन उपसभापती कै. वसंत डावखरे यांना विनंती केली होती. त्यांच्या निर्देशानंतर महापालिकेने कोपरीत प्रसूतिगृह सुरू केले होते. मात्र, या ठिकाणी `एनआयसीयू' युनिट सुरू केले नव्हते. त्यामुळे वेळेआधी आणि कमी वजनाच्या मुलांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करावे लागत होते. तर काही गरीब पालकांना कर्ज काढून, नवजात मुलाला खासगी हॉस्पिटलमधील `एनआयसीयू' मध्ये दाखल करावे लागत होते.
काही वेळा पॅनलवरील डॉक्टर वेळेत न आल्यामुळे मुलांवरील उपचाराला अडचणी येत होत्या. या व्यथेबाबत चव्हाण यांनी पाठपुरावा सुरु ठेवला होता. महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृहात विशेष नवजात केअर युनिट (एनआयसीयू) उभारण्याची मागणी केली होती. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, बांगर यांनी `एसएनसीयू'साठी अर्थसंकल्पात तरतूद केली. याठिकाणी चार स्त्री रोग तज्ज्ञांच्या नियुक्तीसह १८ पेट्यांचे `एनआयसीयू' युनिट उभारले जाईल, अशी माहिती चव्हाण यांनी दिली. या निर्णयाबद्दल कोपरीतील महिलांनी आभार मानले आहेत.
आई-बाळाची ताटातूट टळणार!
लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृहात मातेची प्रसूती झाल्यानंतर कमी वजन व आजारी नवजात बालकांना छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये हलविले जात होते. त्यावेळी माता कोपरीत, तर लेक कळव्याला अशी स्थिती निर्माण होत होती. अशा परिस्थितीत मातेच्या जीवाची घालमेल होत होती. तर नातेवाईकांची दोघांची काळजी घेताना धावपळ उडत होती. कोपरीत नव्या एनआयसीयू' युनिटमुळे आई बाळाची ताटातूट टळेल, याबद्दल भरत आणि ओमकार चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले आहे.