अंबरनाथमध्ये रिक्षाचालकांसाठी विशेष लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:44 AM2021-09-05T04:44:59+5:302021-09-05T04:44:59+5:30
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये रिक्षाचालकांसाठी विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मागणीवरून अंबरनाथच्या ...
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये रिक्षाचालकांसाठी विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मागणीवरून अंबरनाथच्या छाया उपजिल्हा रुग्णालयात हे लसीकरण आयोजित करण्यात आले होते.
अंबरनाथ शहरात हजारो रिक्षाचालक असून, दररोजच्या कामामुळे त्यांना लस घेण्यासाठी रांगेत उभे राहणे शक्य नव्हते. रिक्षाचालक आणि नागरिक यांचा थेट संबंध येत असल्याने रिक्षाचालक सुपर स्प्रेडर ठरू नये, अशीही भीती व्यक्त होत होती. त्यामुळे रिक्षाचालकांसाठी एखादी विशेष लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी रिक्षाचालक करीत होते. त्यामुळे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या पुढाकाराने अंबरनाथच्या छाया उपजिल्हा रुग्णालयात विशेष लसीकरण मोहीम आयोजित केली. या मोहिमेत रिक्षाचालकांसाठी तब्बल १५०० लसी शासनाकडून उपलब्ध करून दिल्या आहेत. आज पहिल्याच दिवशी या मोहिमेत लस घेण्यासाठी रिक्षाचालकांनी गर्दी केली होती. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर, रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पाटील, छाया उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. शशिकांत दोडे यांच्यासह रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.