अंबरनाथमध्ये शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:44 AM2021-08-28T04:44:32+5:302021-08-28T04:44:32+5:30
अंबरनाथ : राज्यात शाळा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्या पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये पालिकेच्यावतीने शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात ...
अंबरनाथ : राज्यात शाळा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्या पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये पालिकेच्यावतीने शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेत शिक्षकांसाठी तब्बल ७५० लसींचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अंबरनाथमधील शासकीय आणि खासगी अशा दोन्ही शाळांचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही मोहीम राबवण्यात आली होती.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर फ्रंटलाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिक आणि त्यानंतर १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. यामध्ये शिक्षकांसाठी कुठलीही विशेष मोहीम सुरू करण्यात आलेली नव्हती. राज्यात येत्या काळात शाळा पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांना कोरोना प्रतिबंधक लस देणे गरजेचे बनले होते. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेने शुक्रवारी शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली. या मोहिमेत ऑर्डनन्स फॅक्टरी हॉस्पिटलमधील लसीकरण केंद्रावर शिक्षकांसाठी कोव्हिशिल्ड लसींचे ७५० डोस उपलब्ध करून दिले आहेत. या लसीकरण मोहिमेला शिक्षकांनी सकाळी ९ वाजल्यापासून गर्दी केली आहे. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्येक शिक्षकाची तपासणी करून त्यांना लस दिली जात होती. या लसीकरण मोहिमेनंतर लस घेतलेल्या शिक्षकांनीही समाधान व्यक्त केले आहे. अंबरनाथ नगरपालिकेने यापूर्वी महिलांसाठी विशेष मोहीम राबवली होती. आता शहरातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विशेष मोहीम राबवून त्यांना काही प्रमाणात दिलासा देण्याचे काम केले आहे.
-------------------------------------------