उल्हासनगरात किन्नरांसाठी विशेष लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:27 AM2021-06-29T04:27:15+5:302021-06-29T04:27:15+5:30
उल्हासनगर : महापालिकेच्या आरोग्य विभागाने वन्या व अशोका फाउंडेशन यांच्या सहकार्याने किन्नरांसाठी सोमवारी विशेष लसीकरण शिबिर झाले. शिबिराचे ...
उल्हासनगर : महापालिकेच्या आरोग्य विभागाने वन्या व अशोका फाउंडेशन यांच्या सहकार्याने किन्नरांसाठी सोमवारी विशेष लसीकरण शिबिर झाले. शिबिराचे उदघाटन नगरसेविका पंचम कलानी यांच्या हस्ते झाले.
कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात कोविड प्रतिबंधात्मक लस घेत आहेत. मात्र यापासून दुर्लक्षित व वंचित राहिलेल्या किन्नर समुदायाच्या लसीकरणाची संकल्पना समाजसेवक शिवाजी रगडे व नगरसेविका रेखा ठाकूर यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे मांडली. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे पेपर नसल्याने लसीकरणासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकत नाहीत. तसेच त्यांना कोविडची बाधा होण्याची शक्यता जास्त आहे. अखेर वन्या व अशोका फाउंडेशनच्या प्रयत्नातून लसीकरण करण्यात आले.
महापौर लीलाबाई आशान, आयुक्त डॉ. राजा दयानिधी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक पगारे, डॉ. अनिता सपकाळे यांच्या सहकार्याने एम. एस. खेमानी शाळेमध्ये लसीकरणाचा कार्यक्रम पार पडला. या शिबिरात २५० ते ३०० तृतीयपंथीयांचे लसीकरण होणार असल्याची माहिती रगडे यांनी दिली.