डोंबिवलीतील विशेष तरुणीची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:39 AM2021-05-16T04:39:13+5:302021-05-16T04:39:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : डोंबिवलीतील ३५ वर्षीय विशेष तरुणीने कोरोनावर मात केली आहे. लंग्ज इन्फेक्शन झालेले हाेते. कल्याण-डोंबिवली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : डोंबिवलीतील ३५ वर्षीय विशेष तरुणीने कोरोनावर मात केली आहे. लंग्ज इन्फेक्शन झालेले हाेते. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली क्रीडा संकुलातील कोविड रुग्णालयाने मेहनत घेउन तिला बरे केले. ही तरुणी बरी झाल्याने शनिवारी तिला घरी सोडण्यात आले. यावेळी सगळा स्टाफ तिला निरोप देण्यासाठी गेटपर्यंत आला आणि भावूक झाला होता.
डोंबिवली पूर्व भागातील मानपाडा परिसरात निर्मल पासड (वय २८) राहतात. ते एका स्टील कंपनीत कामाला आहेत. कोरोनामुळे त्यांना काम नाही. कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना १९ एप्रिलला त्यांचे कुटुंब कोरोनामुळे बाधित झाले. एकाचवेळी निर्मल यांच्यासह त्यांच्या पत्नी किंजल (२७), त्यांचे वडील महेंद्र (६४) आणि विशेष तरुणी असलेली त्यांची बहीण गुंजन (३५) या चौघांना कोरोनाची लागण झाली. १९ एप्रिलला बेड मिळत नव्हता. त्यामुळे एकाचवेळी एकाच रुग्णालयात चार बेड कुठून उपलब्ध होणार, या टेन्शनमध्ये निर्मल होते. त्यांनी बेडसाठी धावपळ सुरू केली. त्यांनी त्यांचे मुलुंड येथे राहणारे भाऊ नीरव पासड यांच्याशी संपर्क साधला. नीरव यांनी त्यांच्या मित्राच्या मदतीने बेड मिळविण्यासाठी धडपड सुरू केली. नीरव व त्यांच्या मित्रांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना ट्विट केले. खा. शिंदे यांनी त्याची दखल घेत डोंबिवली क्रीडा संकुलातील कोविड रुग्णालयाचे डॉ. राहुल घुले यांना ही बाब सांगितली. घुले यांनी तातडीने पासड कुटुंबातील चौघांना चार बेड उपलब्ध करून दिले. निर्मल, त्यांची पत्नी, वडील आणि विशेष तरुणी असलेली त्यांची बहीण यांच्यावर उपचार सुरू झाले. उपचारासाठी दाखल झाल्यानंतर चौथ्यादिवशी त्यांची बहीण गुंजन यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाली. त्यांच्या लंग्जमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्याचे प्रमाणही जास्त होते. त्यावेळी डॉक्टर अन्य स्टाफने विशेष तरुणी असलेल्या गुंजन यांच्या उपचारावर विशेष मेहनत घेत पासड कुटुंबीयांना मानसिक आधार देत त्यांचे धैर्य वाढवण्यास मदत केली.
डाॅक्टरांचे मानले आभार
४ मे रोजी निर्मल, त्यांची पत्नी आणि वडील हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले. मात्र गुंजनवर उपचार सुरू होते. गुंजनही कोरोनातून बरी झाल्यामुळे डॉक्टरांना पासड कुटुंबीयांनी सलाम केला आहे. खा. शिंदे, डाॅ. घुले यांच्यासह महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांचे आभार मानले आहेत.
फोटो-कल्याण-गुंजन पासड
--------------------