जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी
By admin | Published: November 14, 2015 01:45 AM2015-11-14T01:45:54+5:302015-11-14T01:45:54+5:30
अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत ठाण्यातील स्पर्धकांनी आपला दबदबा निर्माण केला. या स्पर्धेत २४ सुवर्णपदकांसह ३६ पदकांची लयलूट केली.
ठाणे : अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत ठाण्यातील स्पर्धकांनी आपला दबदबा निर्माण केला. या स्पर्धेत २४ सुवर्णपदकांसह ३६ पदकांची लयलूट केली. तर, ११ खेळाडूंची निवड शालेय राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या संघात झाली आहे.
अमरावती, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे २ ते ६ नोव्हेंबरदरम्यान राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धा आयोजिली होती. १४, १७ आणि १९ वर्षांच्या गटात झालेल्या या स्पर्धेसाठी ठाणे, रायगडसह अन्य जिल्ह्यांतील सुमारे ६०० खेळाडू सहभागी झाले.
१४ वर्षांआतील मुलींच्या गटात पूर्वा किरवे हिने सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब पटकावला आहे.तिने अनइव्हन बार या प्रकारात सुवर्ण तर बॅलन्सिंग बिममध्ये कांस्यपदकावर नाव कोरले. तसेच सोहम नाईक हिने टेबल व्हॉल्ट प्रकारात सुवर्ण, अनइव्हन बारमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अनन्या बापट हिला दोन सुवर्ण आणि एक रौप्य, ईरा आंग्रे हिने एक सुवर्ण व एक रौप्य तर ऋचा देवळे हिने एक सुवर्ण, संस्कृती पवार हिने एक सुवर्ण पटकाविले.तसेच याच मुलांच्या गटात श्रेयस मंडलिक याने एक सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या कामगिरीच्या जोरावर या सहा जणांची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
१७ वर्षांआतील मुलींच्या गटात पल्लवी दाबक ही सर्वोत्कृ ष्ट खेळाडू आहे. तिने अनइव्हन बार या प्रकारात सुवर्ण आणि फ्लोअर एक्सरसाइज, बॅलन्सिंग बिम या प्रकारात रौप्यपदक मिळाले. तसेच साक्षी पिंपळे हिने दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. याच मुलांच्या वयोगटात कार्तिक पाडाळकर याने पॅरलल बार प्रकारात सुवर्ण, फ्लोअर एक्स आणि टेबल व्हॉल्ट या प्रकारात कांस्य मिळाले. तर, यश शिंदे याने हॉरिझंटल बार प्रकारात रौप्यपदक मिळविले. आदित्य फडणीस याने हॉरिझंटल बार प्रकारात सुवर्ण तर रिग्स् या प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली आहे.
(प्रतिनिधी)