पादचारी पुलाच्या कामाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 12:10 AM2019-12-25T00:10:10+5:302019-12-25T00:10:54+5:30
कोपर स्थानकात उभारले पिलर : पाया, जिन्यासाठीही खोदकाम
अनिकेत घमंडी
डोंबिवली : कोपर स्थानकात दिव्याच्या दिशेला पादचारी पूल नसल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालून रूळ ओलांडावे लागत आहेत. त्यात प्रवाशांना अपघात झाले असून, काहींना जीवही गमवावे लागले आहेत. त्यामुळे पादचारी पूल उभारण्याची मागणी रहिवाशांकडून होत होती. रेल्वे प्रशासनाने त्याची दखल घेत पादचारी पुलाचे काम हाती घेतले आहे. दिव्याच्या दिशेला पूर्वेस पुलाचे पिलर उभारले आहेत.तर, पश्चिेकडे स्वच्छतागृहानजीक पाया व जिन्यासाठी खोदकामास केले आहे.
कोपर स्थानकात दिव्याच्या दिशेला पूल उभारण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, नगरसेवक रमेश म्हात्रे, मुकुंद पेडणेकर आदींनी केली होती. दरम्यान, पावसाळा संपल्यानंतर आता तेथे कामाला वेग आला आहे. पूर्वेला अगोदरच फाउंडेशनचे काम करण्यात आले होते. आता पिलर उभारण्यात आले आहेत. पश्चिमेस स्वच्छतागृहानजीक पिलर उभारल्यानंतर त्यावर गर्डर उभारण्यात येईल, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. जूनच्या अगोदर या पुलाचे काम बहुतांशी पूर्ण करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे.
कोपर स्थानकात सध्या कल्याण दिशेला पूर्व-पश्चिम जोडणारा पादचारी पूल आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलासमवेतच दिवा-वसई मार्गावरील अप्पर कोपर स्थानकातून फलाटात येणाºया जुन्या जोड पुलाचेही काम करावे, अशी प्रवाशांची मागणी होती. मात्र, ती प्रलंबित असल्याने त्याची पूर्तता कधी होणार, असा सवालही प्रवासी करत आहेत.
दिव्याच्या दिशेला उभारण्यात येणाºया पुलाचे गर्डर उभारण्यासाठी रेल्वेने वेळीस ट्रॅफिक-मेगाब्लॉक घ्यावेत,अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे. केवळ पुलाचा सांगाडा उभा करून काहीही उपयोग नाही. त्यावर गर्डर टाकून
तो पूर्णत्वास नेण्यावर भर देणे
गरजेचे आहे.
पूल उभारल्यानंतर पूर्वेला तातडीने संरक्षक भिंत बांधावी, जेणेकरून कोणीलाही रूळ ओलांडता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पूल प्रवाशांसाठी कधीपर्यंत खुला होईल, याची माहिती घेण्यासाठी रेल्वेच्या अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून माहिती मिळू शकली नाही.
होम फ्लॅटफॉर्मचे काम कासवगतीने
कोपर स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचेही काम वर्षभरापासून कासवगतीने सुरू आहे. हे काम वेगाने करून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली.
डोंबिवलीतील पुलाचे प्राधान्याने करा
च् डोंबिवली स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पुलाचेही लोखंडी पिलर १५ दिवसांपूर्वी टाकण्यात आले होते. मात्र, त्यानंतर फारसे काम झाले नसल्याचे निदर्शनास येत आहे.
च् ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलासाठी बुधवारी गर्डर टाकण्यात येणार आहेत. पण त्या आधी मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या डोंबिवलीतील पादचारी पुलाचे काम रेल्वेने वेगाने करायला हवे होते, अशी चर्चा डोंबिवलीतील प्रवाशांमध्ये सुरू होती.