कल्याण-तळोजा मेट्रोला गती, १७ स्थानकांच्या बांधकामांसाठी निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2023 09:29 AM2023-01-01T09:29:15+5:302023-01-01T09:30:24+5:30
या प्रकल्पाचा एकूण खर्च ५,८६५ कोटी इतका आहे. २ फेब्रुवारीपर्यंत निविदा सादर करायच्या आहेत. ७ फेब्रुवारी रोजी निविदा उघडल्या जाणार आहे.
नवी मुंबई : कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल या चार महानगरांच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या कल्याण-तळोजा मेट्रो-१२ या मार्गांचे आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. या मार्गातील सर्व १७ मेट्रो स्थानकांसह डेपोंचे बांधकाम आणि विद्युतीकरणाच्या कामासाठी अखेर एमएमआरडीएला मुहूर्त सापडला आहे. हा संपूर्ण मार्ग २०.७५६ किलोमीटरचा आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ५,८६५ कोटी इतका आहे. २ फेब्रुवारीपर्यंत निविदा सादर करायच्या आहेत. ७ फेब्रुवारी रोजी निविदा उघडल्या जाणार आहे.
या स्थानकांचा समावेश
या मार्गात १७ उन्नत स्थानके असतील. यात गणेशनगर, पिसवलीगाव, गोळवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव या नऊ स्थानकांसह दोन्ही बाजूला फलाटासह स्टेशन हॉल उन्नत राहणार आहे.
निळजेगाव, बाले, वाकळण, तुर्भे, पिसावे डेपो, पिसावे येथील फलाट स्टेशन इमारत व फलाट उन्नत असेल, तर तळोजा स्थानकात एकाच बाजूला फलाट राहणार आहे. वडवलीत एकाच बाजूला ट्रॅक राहणार आहे.
तीन मेट्रो एकमेकांस जोडणार
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोसह कांजुरमार्ग-बदलापूर आणि कल्याण-तळोजा मेट्रो एकमेकास जोडल्या जाणार आहेत. यात भिवंडी-कल्याण मेट्रो ही मेट्रो कल्याण येथेच जोडली जाईल. निळजेजवळ
ती कांजुरमार्ग-बदलापूर
मेट्रोला जोडली जाणार आहे.
२६८.५३ कोटींचा सल्लागार
गायमुख ते मीरा रोड, कल्याण ते तळोजासाठी सिस्ट्रा एस.ए. आणि डी.बी. इंजिनीअरिंग आणि कन्सल्टिंग यांच्या निविदा मंजूर केल्या. २६८ कोटी ५३ लाख ३५ हजार ८६० रुपये खर्च होणार आहे.
शीळफाटा-तळोजा-पनेवलला फायदा
कल्याण-डोंबिवली, शीळफाटासह नवी मुंबईतील रहिवाशांना फायदा होणार आहे. निळजेजवळ एमएमआरडीएचे ग्रोथ सेंटर होत असून शीळफाटा परिसरात लोढा, रुणवालसह खासगी टाउनशिप आकार घेत आहेत. याच भागात
बुलेट ट्रेनचे ठाणे जिल्ह्यातील एक स्थानक-डेपो दिवा-आगासन-म्हातार्डीत उभे राहत आहे.
पिसावेत डेपो
मेट्रो क्रमांक १२ चा प्रमुख डेपो पिसावे येथे असेल. यामुळे एमएमआरडीएला येथे मोठी जागा संपादित करावी लागणार आहे. डेपो म्हटले की, कारशेडही आली. यामुळे भविष्यात या भागात मेट्रोची वर्दळ वाढणार आहे.