ठाण्याचे ९३८ कोटी आचारसंहितेपूर्वी खर्च करा; पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली तंबी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 06:36 AM2024-07-14T06:36:49+5:302024-07-14T06:36:58+5:30

पुण्यानंतर सर्वात जास्त निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्याला

Spend 938 crore in before code of conduct Instruction of Guardian Minister Shambhuraj Desai | ठाण्याचे ९३८ कोटी आचारसंहितेपूर्वी खर्च करा; पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली तंबी

ठाण्याचे ९३८ कोटी आचारसंहितेपूर्वी खर्च करा; पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली तंबी

ठाणे : जिल्ह्याच्या विकासाकरिता राज्य शासनाने ९३८ काेटी रुपये मंजूर केले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २२५ काेटी रुपये जास्त निधी ठाणे जिल्ह्यास प्राप्त झाला आहे. राज्यात अर्थमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुण्यानंतर सर्वात जास्त निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. मंजूर निधीपैकी ३० टक्के निधी प्राप्त झाला असून, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी तत्काळ विकासकामे मंजूर करून घेण्याच्या सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सर्व संबंधितांना केल्या.

येथील नियाेजन भवनमध्ये शनिवारी जिल्हा नियाेजन समितीची (डीपीसी) बैठक देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी डीपीसीच्या निधीच्या खर्चाचा व डाेंगरी विभागाच्या निधीच्या खर्चाचा आढावा घेतला. यावेळी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी चर्चेत सहभाग घेतला. संभाव्य आचारसंहिता लक्षात घेऊन जिल्ह्यातील विकासकामे आठ दिवसांच्या आत मंजूर करून घेण्याचे आदेश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. 

खड्डे ठेकेदारांच्या खर्चातून भरणार

जिल्ह्यातील रस्त्यांवर काेट्यवधी रुपये खर्च करूनही खड्डे पडतात. या पुढे रस्त्यांवर पडणारे खड्डे संबंधित ठेकेदाराच्या खिशातून भरले जातील. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम हाेणार नाही. शहरातील खड्डे संबंधित महापालिकांनी भरण्याच्या सूचना त्यांनी केल्या. महामार्गांवर रस्त्यांची कामे करणाऱ्या एमएमआरडीए, एमएसआरडीसी आदींनाही त्यांनी खडे बाेल सुनावले.

१०० रुग्णवाहिका पडून

आमदार किसन कथाेरे बैठकीत म्हणाले की, मुरबाड तालुक्यात मासगाव येथे नव्या तब्बल १०० रुग्णवाहिका पडून आहेत. त्या त्वरित सेवेत आणणे गरजेचे आहे. देसाई यांनी सर्व रुग्णवाहिकांना जीपीएस लावण्याची सूचना केली. 

Web Title: Spend 938 crore in before code of conduct Instruction of Guardian Minister Shambhuraj Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.