नवी मुंबईतून कमी प्रतीच्या संशयावरून २७ लाख ३९ हजारांचा मसाले पावडर साठा जप्त
By अजित मांडके | Published: November 12, 2022 03:01 PM2022-11-12T15:01:12+5:302022-11-12T15:03:08+5:30
ठाणे - कमी प्रतीचे मसाले पदार्थ असल्याचा संशयावरून ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाने नवी मुंबईतून २७ लाख ३९ ...
ठाणे - कमी प्रतीचे मसाले पदार्थ असल्याचा संशयावरून ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाने नवी मुंबईतून २७ लाख ३९ हजारांचा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने हळद,धनिया,मसाले पावडर आदींचा समावेश असून तेथून ०५ अन्नपदार्थांचे नमुने अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत शासकीय विश्लेषणासाठी घेण्यात आलेल्या असून त्यांचा अहवाल प्राप्त होताच त्या अनुषंगाने उचित कायदेशीर कारवाई घेण्यात येणार असल्याचे ठाणे एफडीएने सांगितले.
दैनंदिन जीवनात नियमितपणे उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध अन्नपदार्थासह "खाद्यतेल" व "पावडर मसाले" यांच्या गुणवत्ता व दर्जा यांची खात्री व खातरजमा करण्यासह सर्व सामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसारच १० नोव्हेंबर २०२२ रोजी ठाणे एफडीएने नवीमुंबई, महापे येथील मेसर्स वेदिक स्पाइसेस प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट नंबर ए- 362, महापे एमआयडीसी, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, या ,"उत्पादक" अन्न आस्थापनातून हळद पावडर (२९६ किलो), धनिया पावडर ( ३९९८ किलो), मिरची पावडर (६४९८ किलो), जीरे पाउडर (५४५४ किलो) तसेच करी पाउडर (२४९८ किलो) असा एकूण रुपये २७ लाख ३९ हजारांचा अन्नपदार्थाचा साठा तो गैरछापाचा व कमी प्रतीचा असल्याचा संशयावरून जप्त करण्यात आला. अन्न आस्थापनातून एकूण ०५ अन्नपदार्थांचे नमुने अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत शासकीय विश्लेषणासाठी घेण्यात आलेल्या असून त्यांचा अहवाल प्राप्त होताच त्या अनुषंगाने उचित कायदेशीर कारवाई घेण्यात येईल. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे कोकण विभागाचे सह आयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी राहुल ताकाटे आणि सहाय्यक आयुक्त (अन्न), अशोक पारधी, यांच्या उपस्थितीत करण्यात आलेली आहे.