मजुरांअभावी यंत्रमाग कारखान्यांची धडधड बंद; व्यावसायिक आर्थिक मंदीच्या कचाट्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 12:21 AM2020-07-23T00:21:30+5:302020-07-23T00:21:37+5:30
कापडाची निर्मिती व व्यापार मोठ्या प्रमाणात असल्याने भिवंडीत यंत्रमाग व्यवसाय वाढला होता.
- नितीन पंडित
भिवंडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनचा फटका शहरातील यंत्रमाग व्यवसायाला चांगलाच बसला आहे. परप्रांतीय मजूर गावाला गेले असल्याने मजुरांअभावी यंत्रमाग कारखाने सध्या बंदच आहेत. लॉकडाऊन व मजुरांच्या स्थलांतरामुळे यंत्रमाग व्यवसाय पुरता डबघाईला गेला आहे. मागील चार महिन्यांपासून कारखाने बंद असल्याने यंत्रमाग व्यावसायिक प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत. शहरात केवळ ५० ते ६० टक्के यंत्रमाग व्यवसाय सुरू आहे. मजुरांचा दिवसभराचा खर्च सोडवता यावा, यासाठी फक्त एकाच पाळीत कारखाने सुरू असून फक्त कच्च्या कापडाची साठवणूक करण्यासाठीच हे यंत्रमाग सुरू आहेत. उर्वरित कारखाने बंदच आहेत.
कापडाची निर्मिती व व्यापार मोठ्या प्रमाणात असल्याने भिवंडीत यंत्रमाग व्यवसाय वाढला होता. एकेकाळी देशविदेशांतील बाजारपेठांवर अधिराज्य गाजविलेला भिवंडीतील यंत्रमाग व्यवसाय मात्र लॉकडाऊनमुळे पुरता डबघाईला आला आहे. २००७ मध्ये भिवंडीत वीज वितरण व बिल वसूल करण्यासाठी टोरंट पॉवर कंपनीची नेमणूक केली. येथूनच या व्यवसायाला उतरती कळा लागली. महावितरणच्या काळात या यंत्रमाग कारखान्यांना जे बिल यायचे, ते टोरंटच्या काळात तिप्पट, चौपट वाढले.
टोरंटने कारभार हाती घेतल्यापासून वीजचोरी थांबली, हे जरी खरे असले तरी छोटा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्याचा चांगलाच फटका बसला. त्यातच वीजचोरीच्या पोलीस केस व आर्थिक भुर्दंड सहन न झाल्याने अनेक छोट्या यंत्रमाग व्यापाºयांनी आपले यंत्रमाग विकले व व्यवसाय बंद केला. आर्थिककोंडीत सापडलेल्या व बंद होत असलेल्या व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी राज्य व केंद्राकडून विविध योजना राबविल्या. मात्र, छोट्या व्यापाºयांना या योजनांचा हवा तसा उपयोग झाला नाही. राजकीय वरदहस्त असलेल्या व अनेक मोठ्या यंत्रमाग व्यापाºयांनीच या योजनांचा लाभ घेतला. नोटाबंदी व जीएसटीमुळेही यंत्रमाग व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. कोरोना संकटाने या व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे.
कोणतेही निश्चित धोरण नाही
कोरोनाच्या संकटामुळे भिवंडीतून कापड प्रक्रियेसाठी राजस्थान, सुरत, अहमदाबाद येथे जाणारा कच्चा माल ट्रान्सपोर्टअभावी कारखान्यातच साठविण्याची वेळ आली आहे. त्यातच यंत्रमागाबाबत सरकारचे कोणतेही धोरण निश्चित नसल्याने त्याचाही फटका यंत्रमाग व्यवसायाला बसला आहे, अशी प्रतिक्रिया भिवंडीतील यंत्रमाग व्यावसायिक भूषण रोकडे यांनी दिली.