पावणेचार लाख बाप्पांना भावपूर्ण निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 03:09 AM2018-09-15T03:09:19+5:302018-09-15T03:09:37+5:30
जिल्ह्यात भक्तांचा उत्साह शिगेला : पर्यावरण संवर्धनास प्राधान्य, प्रशासकीय यंत्रणा सज्ज; निर्माल्यकलशांचीही केली व्यवस्था
ठाणे : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... अशा जयघोषात मोठ्या भावपूर्ण वातावरणात शुक्रवारी दीड दिवसासाठी विराजमान झालेल्या घरगुतीसह सार्वजनिक अशा तीन लाख ७८ हजार ७३३ ठाणेकरांनी निरोप दिला. यंदाही शेकडो भाविकांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी थेट तलावांमध्ये विसर्जन करण्याऐवजी पालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जनाला प्राधान्य दिले.
ठाणे महानगरपालिकेने यावर्षीही इकोफ्रेण्डली गणेशोत्सव संकल्पना राबवून गणेशमूर्ती विसर्जनासाठी विशेष कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. रायलादेवी, उपवन, आंबेघोसाळे, टिकुजिनीवाडी, बाळकुम, खारेगाव आदी कृत्रिम तलावांचा यामध्ये समावेश होता. त्याचप्रमाणे तलाव परिसरात ठिकठिकाणी निर्माल्यकलशही उभारले होते. तसेच वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, विद्युतव्यवस्था, ध्वनिक्षेपक यंत्रणा आदी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. विसर्जन घाट आणि कृत्रिम तलावांच्या ठिकाणी सीसीटीव्हींद्वारे पोलिसांनी विशेष निगराणी ठेवली होती. प्रत्येक विसर्जन तलावांच्या ठिकाणी पोलिसांच्या मदतीला खासगी कार्यकर्ते होते.
विसर्जनादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. गुरुवारी वाजत गाजत आगमन झालेल्या बाप्पाला लगेच निरोप देणे भक्तांच्या जीवावर आले होते. मात्र, तरीही ढोलताशांच्या गजरात बाप्पाला पुन्हा लवकर यायचे आमंत्रण देत विसर्जन केले.
विसर्जन घाटावर भक्तांची गर्दी
दीड दिवस गणरायाची भक्तिभावाने पूजा केल्यानंतर पर्यावरणाभिमुख गणेश विसर्जनासाठी ठाणे महानगरपालिकेसह आयुक्तालयातील सहाही महापालिकांनी केलेल्या विशेष विसर्जन घाटांचा गणेशभक्तांनी आवर्जून लाभ घेतला.