माजी विद्यार्थ्यांचे स्वयंस्फूर्तीने ज्ञानदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 12:08 AM2020-09-29T00:08:33+5:302020-09-29T00:08:45+5:30
ऑनलाइन शिक्षणाला पर्याय : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मोबदला न घेता अध्यापन
जव्हार : कोरोना महामारीमुळे यंदा शैक्षणिक वर्षात अद्यापपर्र्यंत शाळा बंदच आहेत, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी महागडा मोबाईल घेऊन आॅनलाइन शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून माजी विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेतला आहे. अनलॉक लर्निंगवर पर्याय म्हणून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना कुठलाही मोबदला न घेता माजी विद्यार्थी स्वयंस्फूर्तींने शिक्षण देत असून गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी कुठल्याच मोबाइल कंपनीचे नेटवर्क उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थी आॅनलाइन शिक्षणापासून वंचित राहिले होते, मात्र आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचेही शिक्षण सुरू राहावे म्हणून काही माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन गावपाड्यांत जाऊन इयत्तेनुसार शिक्षण दिले जात आहे. शिक्षण देताना गावातील मुलांची इयत्तेनुसार यादी तयार करून एखाद्या अंगणात, मोकळ्या जागेत बसून, कोरोनाचे नियम पाळून सुरक्षित अंतर ठेवून शिक्षण दिले जात आहे. रोज संध्याकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत इयत्ता ५ वी ते ८ वी आणि रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत, इयता ८ वी. ते १० वी पर्यंत असे शिक्षण दिले जात आहे. तसेच आश्रमशाळेतील शिक्षक दिवसाआड शिक्षण देत असलेल्या ठिकाणी भेटी देतात. दरम्यान, त्यांना खडू, पेन्सिल, वह्या, पुस्तके असे साहित्य शिक्षक उपलब्ध करून देतात. शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना गावातील लोकांकडून आणि त्या आश्रमशाळेतील शिक्षकांकडून अभिनंदन होत आहे.
आम्ही त्या आश्रमशाळेत शिक्षण घेतले आहे. माजी विद्यार्थी म्हणून स्वयंस्फूर्तीने मुलांना शिकवतो. आमची कुठल्याही प्रकरणाची मोबदल्याची अपेक्षा नाही. त्या शाळेने आम्हाला शिक्षण दिले म्हणून आमच्या गावातील मुलांना आम्ही शिक्षण देतो. त्यात आमचाही सराव होतो.
- विजय भरसट,
माजी विद्यार्थी, बीएससी, बीएड