ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर सादर झालेल्या कथुलीला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 05:12 PM2018-05-21T17:12:01+5:302018-05-21T17:12:01+5:30
रविवारी ३७७ क्रमांकाच्या अभिनय कट्ट्यावर माधव साने लिखित "कथुली" या दोन अंकी नाटकाचे सादरीकरण झाले. ठाणे महानगर पालिका परिवहन सेवेतील कलाकार या नाटकाचे सादरीकरण केले.
ठाणे : रविवारी ३७७ क्रमांकाच्या अभिनय कट्ट्यावर प्रमुख आकर्षण होते ते म्हणजे “कथुली” या दोन अंकी नाटकाचे सादरीकरण. अभिनय कट्ट्यावर आजवर एकपात्री, द्विपात्री, स्किट, एकांकिका, दिर्घांक अशा अनेक प्रकारातील कलाकृती सादर झाल्या. परंतु या रविवारी अभिनय कट्ट्याच्या इतिहासात प्रथमच कट्ट्यावर दोन अंकी पूर्ण लांबीचे नाटक सादर करण्यात आले.
विठ्ठल रखुमाईच्या संसारावर आधारित "कथुली" हे माधव साने लिखित व कदिर शेख दिग्दर्शित नाटक यावेळी अभिनय कट्ट्यावर सादर झाले. विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व अभिनय, दिग्दर्शन यासाठी पारितोषिके पटकावलेल्या अभिनय कट्ट्याच्या या नाटकाने अभिनय कट्ट्यावर दोन अंकी पुर्ण लांबीच्या नाटकांच्या सादरीकरणाचा श्रीगणेशा झाला. महाराष्ट्रातील सर्व वैष्णवांचे आराध्य दैवत श्रीविठ्ठल. विठ्ठल म्हणजे भक्तांची विठूमाऊलीच. ही विठूमाऊली नेहमीच भक्तांच्या गराड्यात असते. पण या विठ्ठलाचासुद्धा संसार आहे, त्यालासुद्धा रखुमाईसारखी पत्नी आहे आणि सर्वसामान्य भक्ताच्या संसारात असतात तशा प्रापंचिक अडचणी त्याच्याही संसारात आहेत. एरवी विठूमाऊली आपल्या भक्तांना अडचणीच्या काळात आधार देत असते, मार्गदर्शन करत असते. पण स्वतःच्या संसारातील अडचण सोडवण्यासाठी मात्र त्रासलेला देव भक्ताकडून मदत घेतो. हा भक्तही इरसाल. मग पुढे काय धमाल होते, या सगळ्याचे हलकेफुलके पण तेवढेच अंतर्मुख करणारे चित्रण कथुली या नाटकामध्ये केले आहे. या नाटकाचे वैशिष्ठ म्हणजे या नाटकामधील सर्वच पात्र हि ठाणे परिवहन सेवेच्या कर्मचा-यांनी साकारली. त्यामध्ये मोहन पानसरे, प्रतिभा घाडगे, माधुरी कोळी, अर्जुन नाईक, नागेश जुवेकर, राजेंद्र एडवणकर, अशोक वाघमारे, शिरीष दळवी, श्रीराम विधाटे, नरेंद्र सावंत, मधुकर गावडे, प्रमोद कोळी, मधुसूदन डोईफोडे, तसेच अभिनय कट्ट्याचे कलाकार राजश्री गढीकर, रुक्मिणी कदम व शिवानी देशमुख यांचा सहभाग होता. तसेच अभिनय कट्ट्याच्या प्रथेप्रमाणे कट्ट्याची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कट्ट्याचे दीपप्रज्वलन मधुकर गावडे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर शुभांगी गजरे हिने शांतेच कार्ट चालू आहे या नाटकातील एक प्रसंग सादर केला. यावेळी संपूर्ण कट्ट्याचे निवेदन वीणा छत्रे हिने केले.