पाणी साचलेल्या वसाहतींमध्ये जंतुनाशक फवारणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:33 AM2021-07-25T04:33:19+5:302021-07-25T04:33:19+5:30
भिवंडी : महानगरपालिकेच्या महापौर प्रतिभा पाटील यांनी शहरातील सर्व प्रमुख पूरग्रस्त भागाची शुक्रवारी पाहणी केली. शहरातील ज्या सखल भागांमध्ये ...
भिवंडी : महानगरपालिकेच्या महापौर प्रतिभा पाटील यांनी शहरातील सर्व प्रमुख पूरग्रस्त भागाची शुक्रवारी पाहणी केली. शहरातील ज्या सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचले होते, अशा संगमपाडा, म्हाडा कॉलनी, महापालिका शाळा, कोंबडपाडा, अजय नगर, शिवाजी चौक, आदर्श पार्क, नजराना कंपाउंड, शिवाजी नगर, भाजी मार्केट, भावे कंपाउंड आदी ठिकाणची पाहणी केली. तर तेथे तत्काळ औषध फवारणी करण्यात यावी, असे निर्देश पालिका प्रशासनाला त्यांनी दिले आहेत. यावेळी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख, मुख्यालय उपायुक्त मुख्यालय योगेश गोडसे, आपत्कालीन विभाग प्रमुख सुनील भोईर उपस्थित होते.
पुराचे पाणी साचलेल्या परिसरातील कचरा तातडीने सफाई करून या परिसरात जंतुनाशक, डासअळी नाशक, दुर्गंधीनाशक फवारणी करण्यात यावी, अशा सूचना महापौर प्रतिभा पाटील यांनी सर्व संबंधितांना दिल्या आहेत. तसेच उर्वरित भागात पावसाच्या पाण्याचा निचरा होताच सफाई करण्यात यावी व औषध फवारणी करण्यात यावी. या भागात पावसाळी संसर्गजन्य साथीचे आजार उद्भवू शकतात, ही बाब लक्षात घेऊन त्यासाठी अत्यावश्यक वैद्यकीय पथके तैनात करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना महापौर पाटील यांनी प्रशासनास दिल्या आहेत.