आधारवाडी डम्पिंगवर होणार सुगंधी द्रव्याची फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:38 AM2019-07-26T00:38:25+5:302019-07-26T00:38:52+5:30
महापौरांनी दिला निधी : परिसरातील रहिवाशांना दिलासा
कल्याण : कचऱ्याची विल्हेवाट व वर्गीकरणाअभावी सुटणाºया कचºयाच्या दुर्गंधीमुळे पश्चिमेतील आधारवाडी डम्पिंग ग्राउंड परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. त्यामुळे ही दुर्गंधी दूर करण्यासाठी कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनीता राणे यांनी ७१ लाख ८६ हजार रुपयांचा महापौर निधी दिला आहे. या निधीतून डम्पिंग ग्राउंडवर विशिष्ट मीटर अंतराच्या रेंजमध्ये सुगंधी द्रव्याची फवारणी करणारे मोठे पंखे उभारले जाणार आहेत. त्यामुळे कचºयाची दुर्गंधी इतरत्र पसरणार नाही, असा दावा केला जात आहे.
कल्याण-डोंबिवली शहरांतील सगळा गोळा झालेला कचरा आधारवाडी डम्पिंगवर आणून टाकला जातो. कचºयाचे वर्गीकरण केले जात नसल्याने घन व ओल्या कचºयामुळे डम्पिंगवर प्रचंड दुर्गंधी सुटते. ती दूर करण्यासाठी महापौरांनी ७१ लाख ८६ हजार रुपयांचा महापौर निधी दिला आहे. त्यामुळे आयुक्त गोविंद बोडके यांनी या कामासाठी निविदा मागवल्या होत्या. व्हेलोसिटी व्हेंचर्स कंपनीची निविदा अंतिम करण्यात आली. हा विषय गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला. हा विषय जनहिताशी निगडित असल्याने त्याला सभापती दीपेश म्हात्रे यांनी तातडीने मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर महापौरांचा निधी एका विधायक कामासाठी राणे यांनी दिल्याने त्यांचे सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.
डम्पिंग ग्राउंडवर विशिष्ट मीटर अंतराच्या रेंजमध्ये सुगंधी द्रव्याची फवारणी करणारे मोठे पंखे उभारले जाणार आहेत. ज्यामुळे कचºयावर होणाºया फवारणीमुळे कचरा दबून राहील. तसेच त्यातून दुर्गंधी येणार नाही. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत अशा प्रकारचा प्रयोग प्रथमच कल्याण-डोंबिवली महापालिका करत आहे, याकडे महापौर राणे यांनी लक्ष वेधले आहे.
दरम्यान, महापौर निधीतील उर्वरित रक्कम याच धर्तीवर खर्च करण्यात येणार आहे. डोंबिवलीतील दत्तनगर येथील स्मशानभूमी आणि कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोडवरील स्मशानभूमीत अशा प्रकारचे सुगंधी द्रव्य फवारणाचे फॅन उभारले जाणार आहेत. तेथे अंत्यसंस्कार अग्नी देऊन केला जातो. त्यावेळी राख शिल्लक राहते. ती वाºयावर इतरत्र उडू नये, तसेच तेथील वातावरणही सुगंधित राहावे, यादृष्टीने तेथेही हे पंखे बसविले जाणार आहेत. त्याचा प्रस्तावही लवकर तयार करून तो स्थायी समितीमध्ये मंजुरीकरिता पाठविला जाणार आहे.
गटारे, पायवाटांना बगल
महापौर राणे यांना यंदाच्या वर्षी एक कोटी ५० लाख रुपयांचा महापौर निधी मिळाला. परंतु, हा निधी गटारे, पायवाटांच्या कामांवर खर्च न करता तो काही विधायक कामांसाठी खर्च करावा, असे विचार त्यांच्या मनात होते. डम्पिंगवरील दुर्गंधीचा जटिल प्रश्न पाहता त्यावर तोडगा काढण्यासाठी हा निधी उपयोगाला आला, याचे समाधान आहे. प्रत्यक्षात कंपनीकडून काम सुरू केल्यावर दुर्गंधी दूर होण्यास मदत होणार आहे, असे राणे म्हणाल्या.