डंपिंग ग्राउंडवर परफ्यूमची फवारणी; पंतप्रधान मोदींमुळे आधारवाडीचे 'कल्याण'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 12:24 PM2018-12-18T12:24:15+5:302018-12-18T12:30:42+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळानं कल्याण-डोंबिवलीत दाखल होणार आहेत.
कल्याण- पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात कल्याण-डोंबिवलीत दाखल होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेनं रस्त्यावरील सर्व गतिरोधक हटवले आहेत. कल्याण-भिवंडी बायपासवरील वाहनांच्या धुरानं काळेकुट्ट झालेले दुभाजक महापालिकेनं टँकरच्या पाण्यानं धुऊन स्वच्छ केले आहेत. विशेष म्हणजे केडीएमसीनं आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवरही परफ्यूमचे फवारे मारले आहेत. जेणेकरून आधारवाडी डंपिंग ग्राऊंडमधून मोदींच्या दौऱ्यादरम्यान दुर्गंधी सुटू नये.
तसेच आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवर 16 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि दहिसर-मीरा-भाईंदर मेट्रो रेल्वेमार्गासह पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रो व सिडकोच्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभासाठी कल्याणमधील फडके रोडवर येणार आहेत. आधारवाडी डंपिंग ग्राऊंडही फडके रोडच्या विरुद्ध दिशेला आहे. त्यामुळे केडीएमसीनं या डंपिंग ग्राऊंडवर सुगंधाचे फवारे मारले आहेत. मोठी गर्दी झाल्यास ती सांभाळण्याचे आव्हान सुरक्षा यंत्रणेपुढे राहणार आहे.
निषेध करणारे नजरकैदेत..
कल्याणमध्ये मेट्रोच्या भूमिपूजनासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत, मात्र कल्याणमधील काँग्रेसचे पदाधिकारी पंतप्रधानांचा निषेध करण्यासाठी रस्त्यावरती उतरू नये आणि या कार्यक्रमाला कुठल्या प्रकारची बाधा निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी अशा वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या घराबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.