विंधण विहिरीतून झऱ्याचे पाणी बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:39 AM2021-07-31T04:39:42+5:302021-07-31T04:39:42+5:30
भातसानगर : शहापूर तालुक्यातील शेई गावच्या अंतर्गत असणाऱ्या साखरवाडी येथील एका विंधण विहिरीतून चक्क पाण्याच्या धारा बाहेर वाहत आहेत. ...
भातसानगर : शहापूर तालुक्यातील शेई गावच्या अंतर्गत असणाऱ्या साखरवाडी येथील एका विंधण विहिरीतून चक्क पाण्याच्या धारा बाहेर वाहत आहेत. हे दृश्य पाहण्यासाठी अनेक जण येथे येत आहेत.
सतत पडत असलेल्या पावसामुळे जमिनीत पाणी मुरते. त्यातून अनेक सुप्त झरे, उबिळ वाहण्यास सुरुवात होते. असा झरा शेई गावाच्या वासिंद रस्त्याच्या बाजूला साखरपाड्यासाठी खोदलेल्या विंधण विहिरीला लागला आहे. या विंधण विहिरीला इतके पाणी लागले आहे की, ते उन्हाळ्यात कमी होत तर नाहीच, पण पावसाळ्याच्या दिवसात विंधण विहिरीच्या बाहेर फवाऱ्याच्या स्वरूपात चौफेर उडत आहे. या विंधण विहिरीवरून आदिवासी वाडीसाठी सौरऊर्जेवर पाणी योजना सुरू करण्यात आली आहे. वर्षभर हे पाणी कमी होत नसल्याचे ग्रामस्थ प्रकाश तारमळे यांनी सांगितले. तसेच पावसाळ्यात ते थेट बाहेर उडत असते. पावसाळा संपला तरी हा स्रोत अनेक महिने तसाच राहतो. त्यामुळे परिसरातील पाणीटंचाई दूर झाली असून या विंधण विहिरीवर मोठी पाणी योजना सुरू केली, तर त्याद्वारे अनेक गावांची तहान भागवणे शक्य हाेईल, असे वासिंदचे माजी सरपंच राजेंद्र म्हस्कर यांनी सांगितले.