कारवाईसाठी गेलेल्या एसआरए अधिकाऱ्यांना संतप्त नागरिकांनी पिटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:44 AM2021-08-12T04:44:59+5:302021-08-12T04:44:59+5:30
ठाणे : महापालिका मुख्यालयासमोर ‘एसआरए’अंतर्गत उभ्या राहिलेल्या पहिल्या प्रकल्पातील वाढीव बांधकामांवर कारवाई करण्यासाठी मंगळवारी गेलेल्या ‘एसआरए’च्या अधिकाऱ्यांनी तेथील ८ ...
ठाणे : महापालिका मुख्यालयासमोर ‘एसआरए’अंतर्गत उभ्या राहिलेल्या पहिल्या प्रकल्पातील वाढीव बांधकामांवर कारवाई करण्यासाठी मंगळवारी गेलेल्या ‘एसआरए’च्या अधिकाऱ्यांनी तेथील ८ ते १० बांधकामांवर कारवाई केली. मात्र विकासकावर कारवाई करण्याची मागणी करीत स्थानिक रहिवाशांनी या कारवाईला विरोध करीत ‘एसआरए’च्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावले.
ठाणे महापालिका मुख्यालयासमोर सुमारे २० वर्षांपूर्वी एसआरए प्रकल्पांतर्गत १० इमारती उभारण्यात आल्या; परंतु या इमारतींना अद्यापही ओसी मिळालेली नाही. या इमारतीत मागील २० वर्षांपासून रहिवासी वास्तव्यास होते. दरम्यान, डिसेंबरमध्ये सुमारे ५० बांधकामधारकांना एसआरएच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या. ओसी हवी असल्यास ही वाढीव बांधकामे तोडावी लागतील, असे सांगण्यात आले. मंगळवारी दुपारी १२ वाजता एसआरएचे पथक कारवाईसाठी गेले होते. वाढीव बांधकामांवर कारवाई सुरू झाली होती; परंतु मागील एवढी वर्षे आम्ही येथे वास्तव्यास असताना कारवाई कशासाठी? असा सवाल रहिवाशांनी करीत कारवाईला विरोध केला. माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत, कारवाईला विरोध केला. संतप्त रहिवाशांनी एसआरए अधिकाऱ्यांना पिटाळून लावले. त्यामुळे कारवाईला तूर्त ब्रेक लागला.
दरम्यान, या इमारती उभारत असताना संबंधित विकासकाने महापालिकेचा ३३ टक्के हिस्सा अद्याप दिलेला नाही. एसआरडी १० वर्षांचा टॅक्स विकासकाने भरलेला नाही. त्यामुळे महापालिकेने इमारतींना ओसी दिलेली नाही. आता ओसी हवी असेल तर वाढीव बांधकामांवर कारवाई करावी लागेल, असे एसआरएचे म्हणणे आहे. विकासकाने महापालिकेची फसवणूक केली असल्याने त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. रहिवाशांना नाहक त्रास का भोगावा लागत आहे? असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. तसेच जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत कारवाई करू नये, अशी मागणी केली आहे. विकासकावर कारवाई करा व या इमारतींना ओसी देऊन रहिवाशांची घरे त्यांच्या नावावर करा.
- राजेश मोरे, माजी सदस्य, परिवहन समिती, ठाणे
...........