अंबरनाथ, बदलापूरमध्येही एसआरए योजना लागू , सरकारची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 02:12 AM2020-08-30T02:12:07+5:302020-08-30T02:12:29+5:30
मुंबई महानगर क्षेत्र हे उद्योग व रोजगारासाठी संधी उपलब्ध करून देत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक रोजगाराच्या निमित्ताने येथे येतात. मुंबई-ठाणे-नवी मुंबई या महानगरांमध्ये राहणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने अंबरनाथ, बदलापूर, वसई-विरार अशा नगरपालिका क्षेत्रांत राहण्यासाठी ओढ असते.
अंबरनाथ - मुंबई महानगर क्षेत्रात येणाऱ्या ‘अ’ वर्ग नगरपालिका क्षेत्रांत झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अंबरनाथ, बदलापूर या पालिकांमधील वाढती झोपडपट्टी पाहता येथे ही योजना लागू झाल्याने येथील झोपडीवासीयांनाही चांगले जीवन जगता येईल, असा विश्वास आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी व्यक्त केला.
मुंबई महानगर क्षेत्र हे उद्योग व रोजगारासाठी संधी उपलब्ध करून देत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक रोजगाराच्या निमित्ताने येथे येतात. मुंबई-ठाणे-नवी मुंबई या महानगरांमध्ये राहणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने अंबरनाथ, बदलापूर, वसई-विरार अशा नगरपालिका क्षेत्रांत राहण्यासाठी ओढ असते. त्यामुळे या नगरपालिका क्षेत्रांमध्येही झोपडपट्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरांतील सुविधांवर ताण येत आहे. त्यामुळे या क्षेत्रांत एसआरए योजना लागू व्हावी, यासाठी किणीकर यांनी पाठपुरावा केला होता. बीएसयूपी योजना अपयशी ठरल्यानंतर केंद्राच्या प्रधानमंत्री आवास योजनेलाही नगरपालिका क्षेत्रांमध्ये योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने एसआरएची गरज होती.
शहराचा सुनियोजित विकास साधण्यासाठी झोपडपट्टीचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने एसआरए योजना अंबरनाथ आणि बदलापूर शहरांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे.
- डॉ. बालाजी किणीकर, आमदार, अंबरनाथ