मीरा भाईंदरमध्ये क्लस्टरसह एसआरए पण लागू करणार - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 07:46 PM2022-12-13T19:46:00+5:302022-12-13T19:47:09+5:30
मुख्यमंत्री म्हणाले की, मेट्रो कारशेडच्या जागेला लोकांचा विरोध असून कारशेड उत्तन येथे न्यायचा आहे.
मीरारोड - मीरा भाईंदरमधल्या जुन्या व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी ठाण्याच्या धर्तीवर क्लस्टर योजना लागू करणार. त्याच सोबत झोपडपट्टी मुक्त शहर करण्यासाठी शहरात झोपडपट्टीवासीयांना इमारतीत पक्की घरे देण्यासाठी एसआरए योजना सुद्धा लागू करू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाईंदर येथील मीरा भाईंदर संस्कृती आर्ट फेस्टिव्हलमध्ये बोलताना दिली.
प्रताप सरनाईक फाउंडेशन व संस्कृती युवा प्रतिष्ठान आदींच्या वतीने इंद्रलोक येथील बाळासाहेब ठाकरे मैदानात आयोजित आर्ट फेस्टिव्हल च्या समारोप सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार प्रताप सरनाईक, गीता जैन, प्रकाश सुर्वे सह जिल्हाधिकरी अशोक शिनगारे, पालिका आयुक्त दिलीप ढोले, माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा, मुझफ्फर हुसेन, नरेंद्र मेहता आदींसह अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कुमार विश्वास यांच्या कविता व मिश्कील टिप्पण्यांच्या कार्यक्रमाचा मुख्यमंत्र्यांनी आनंद घेतला.
मुख्यमंत्री म्हणाले की, मेट्रो कारशेडच्या जागेला लोकांचा विरोध असून कारशेड उत्तन येथे न्यायचा आहे. मीरा भाईंदरची मेट्रो हे सरनाईकानी आणली व त्यासाठी त्यांनी आंदोलने केली. त्यात आम्ही सुद्धा सहभागी होतो. मुंबई , ठाण्याचा जसा विकास होतोय तसाच मीरा भाईंदरचा करणार आहोत. सूर्या पाणी पुरवठा योजना , शहरातील रस्ते काँक्रीटचे करण्यासाठी निधी दिला आहे. दहिसर - भाईंदर रस्ता सुद्धा आम्ही करणार आहोत ज्यामुळे टोल नाक्यातून सुटका होईल.
शहराची विकास कामे करतानाच आपली संस्कृती, परंपरा वाढवण्याचे काम आर्ट फेस्टिव्हलच्या माध्यमातून या. सरनाईक करतात. शहराच्या विकासाची कामे आ. सरनाईक व आमदार गीता जैन करत आहेत. शहराला भरपूर निधी दिला आहे. आता निधीचे बोलू नका. नंतर साठी सुद्धा काही बाकी ठेवा? नाहीतर बाकीचे पण मागतील आणि आमचा खजिना खाली होईल असे मुख्यमंत्री म्हणाले.
अयोध्येला जायचे आहे, एकदा जाणार होतो पण विमानातून उतरावे लागले. आम्ही काम करायला लागलो त्यामुळे काही जण आता रस्त्यावर फिरायला लागले, मोर्चा पण काढण्याची तयारी करत आहेत. समृद्धी महामार्गला काही जणांनी विरोध करायला लावला होता असा टोला मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला.
पूर्वी पाकिस्तान केवळ बाळासाहेबांना घाबरायचे. बाळासाहेब म्हणायचे की एक दिवसाचा पंतप्रधान करा मग राम मंदिर बांधतो व काश्मीर मधील कलम ३७० हटवतो. बाळासाहेबांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पूर्ण करत आहेत त्यामुळे झालेली चूक सुधारून राज्यात भाजपा सोबत सरकार बनवले आहे. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचा पूर्ण पाठिंबा व सहकार्य आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
भाषण सुरू असताना वीज गुल
मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना काही वेळा साठी वीज गेल्याने काळोख झाला. त्यावर, भाषण बंद करू का? पोलीस आयुक्तांनी वीज घालवली का? असा मिश्किल टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.