दहशतवादमुक्तीची सुरुवात प्रभू श्रीरामांनी केली; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 07:09 AM2024-01-21T07:09:46+5:302024-01-21T07:09:53+5:30
काही जण राम मंदिराच्या कार्यक्रमाला जात नाहीत, असा चिमटा फडणवीसांनी काढला.
ठाणे : सुशसान, पारदर्शिता, समान संधी आणि वसुधैव कुटुम्बकम् याचा एकत्रित विचार म्हणजे रामराज्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादमुक्त भारत, गरिबीमुक्त भारत, परिवारवाद मुक्त भारत, महिलांचा सन्मान करणारा भारत, आत्मनिर्भर भारत, एक भारत, श्रेष्ठ भारत या सगळ्या रामराज्याच्या संकल्पना मांडल्या आहेत. दहशतवादापासून मुक्तीची सुरुवात प्रभू श्रीरामांनी केल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात केले. रामराज्य म्हणजे दहशतवादमुक्त राज्य असे सांगत त्यांनी रामराज्याची संकल्पना मांडली.
गावदेवी मैदान येथे सुरू असणाऱ्या रामायण महोत्सवाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. २२ जानेवारीचा दिवस कारसेवकांकरिता आनंदाचा दिवस आहे. यानिमित्त नवीन भारताची निर्मिती मोदी करत आहे. गेल्या ९ वर्षांत वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून २५ कोटींवर लोक गरिबी रेषेच्या वर आले. हा जगाच्या इतिहासातला रेकॉर्ड आहे. ज्यांच्या मनात, कामात राम त्यांच्या हातून हे घडते. रामराज्याची संकल्पना मांडत पंतप्रधान मोदी यांनी हे कार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
रामराज्य संकल्पनेवर देशाचा कारभार
काही जण राम मंदिराच्या कार्यक्रमाला जात नाहीत, असा चिमटा फडणवीसांनी काढला. हा निर्णय न्यायालयाचा आहे, असे म्हणत आहेत. परंतु त्यांनीच २००७ मध्ये सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रात राम काल्पनिक असल्याचे म्हटले होते. मंदिर उभे राहू नये यासाठी त्यांनी व्यवस्था उभी केली होती. असे हे रामाला नाकारणारे लोक आहेत, असा टोला विरोधकांना लगावत रामराज्याच्या संकल्पनेवरच देशाचा कारभार सुरू आहे, असा दावाही फडणवीस यांनी केला.
प्रभू श्रीरामांनी महिलांचा जसा सन्मान केला, त्याचप्रमाणे मोदीदेखील सातत्याने सांगत आहेत की, भारताला जर विकसित राष्ट्र व्हायचे असेल तर भारतात ५० टक्के लोकसंख्या ज्या महिला आहेत यांना मानव संसाधनांमध्ये परिवर्तित केले पाहिजे. महिलांना ३३ टक्के लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण देण्याचा कायदाही मोदींनी केला. इनोव्हेशनमध्ये भारत हा पहिला देश झाला की ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान उतरवले. आता सूर्याचेही मॅपिंग आपण करतोय, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले, प्रदेश प्रवक्ता सुजय पत्की, सृजन संपदा ट्रस्टच्या अध्यक्षा नयना सहस्त्रबुद्धे उपस्थित होते.