श्रीदेवी रुग्णालयाचा परवाना केला रद्द, कल्याण-डोंबिवली मनपाचा दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 12:09 AM2020-08-22T00:09:53+5:302020-08-22T00:10:03+5:30
अन्य आजारांचे उपचार घेत असलेल्या रुग्णांवर तसेच डायलिसिसच्या रुग्णांवरील उपचार सुरूराहतील, अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.
कल्याण : कोरोना रुग्णांकडून उपचारापोटी जास्तीचे बिल आकारल्याने श्रीदेवी रुग्णालयास कल्याण-डोंबिवली महापालिकेने दणका दिला आहे. या रुग्णालयाचा परवाना ३१ आॅगस्टपर्यंत रद्द केला आहे. मात्र, तेथे अन्य आजारांचे उपचार घेत असलेल्या रुग्णांवर तसेच डायलिसिसच्या रुग्णांवरील उपचार सुरूराहतील, अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.
श्रीदेवी रुग्णालयाने कोरोनाबाधित महिलेकडून जास्तीचे बिल आकारले होते. रुग्णालयाने तिच्या बिलात कोविड कचऱ्याच्या विल्हेवाटीचे शुल्कही आकारले होते. तसेच तिला डिस्चार्ज दिला नव्हता. याप्रकरणी शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी पीपीई किट घालून महिला रुग्णास उचलून घरी नेले हाते. तसेच रुग्णालय प्रशासनास जाब विचारला होता. याप्रकरणी रुग्णालयाच्या विरोधात कारवाईची मागणी मनपा आयुक्तांकडे गायकवाड यांनी केली होती. या नंतरही दोन रुग्णांकडून जास्तीचे बिल आकारले गेल्याची तक्रार मनपा प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. त्यामुळे मनपाने रुग्णालयास नोटीस पाठवून विचारणा केली होती. मात्र, रुग्णालयाने त्याचे उत्तर न दिल्याने रुग्णालयाचा परवाना मनपाने ३१ आॅगस्टपर्यंत रद्द केला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दिली आहे.
>रुग्णाकडून आकारलेले जास्तीचे पैसे त्याला परत न केल्यास कारवाई कायम राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. रुग्णाकडून एक लाख ७० हजार रुपयांचे बिल आकारले होते. त्यात सूट दिली. तरीही ते बिल एक लाख १० हजार रुपयांचे झाले होते. सूट दिल्यानंतरही बिलाची रक्कम सरकारी दरानुसार होत नसल्याचे निदर्शनास आल्याने मनपा प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.