श्रीराम समुद्र याच्या कोठडीत वाढ, सागर इन्व्हेस्टमेंट घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 06:10 AM2018-03-14T06:10:23+5:302018-03-14T06:10:23+5:30
बदलापूरच्या बहुचर्चित सागर इन्व्हेस्टमेंट घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी श्रीराम समुद्र याला मंगळवारी कल्याण न्यायालयात पुन्हा हजर केले असता त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
बदलापूर : बदलापूरच्या बहुचर्चित सागर इन्व्हेस्टमेंट घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी श्रीराम समुद्र याला मंगळवारी कल्याण न्यायालयात पुन्हा हजर केले असता त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. १६ मार्चपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, इतर दोघांना २७ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
बदलापूरमध्ये सागर इन्व्हेस्टमेंटच्या नावावर भरीव व्याजदराचे आमिष दाखवत, शेकडो गुंतवणूकदरांची १५० कोटींहून अधिकची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात श्रीराम समुद्र, त्याची पत्नी अनघा वर्षभरापासून बेपत्ता होते. गुंतवणूकदारांनीही या दोघांना ताब्यात घेण्यासाठी सातत्याने आंदोलने, निदर्शने केली. दोघेही न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी फिरत होते. अखेर न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळताच त्यांनी शरणागती पत्करली. पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांना १३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यात श्रीराम, अनघा यांच्यासोबत नातेवाईक कैवल्य समुद्र आणि सुप्रीती समुद्र यांचा समावेश होता. या चौघांना कल्याण न्यायालयात हजर केले असता श्रीराम आणि अनघा यांच्या पोलीस कोठडीत वाढ केली. तर कैवल्य, सुप्रिती यांना २७ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
>गुंतवणूकदारांची यादी मिळविण्याचा प्रयत्न
श्रीराम यांच्याकडे गुंतवणूकदारांची सर्व यादी असल्याने ती मिळविण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. बदलापूरमधील अनेक बड्या व्यक्तींनीदेखील त्यांच्याकडे गुंतवणूक केलेली होती. मोठ्या प्रमाणात काळा पैसा गुंतविल्याने त्याचाही तपास पोलीस करत आहेत.