सृष्टी - पेणकरपाडा भागातील कांदळवन स्वच्छतेसाठी अखेर शाळकरी विद्यार्थ्यांचा पुढाकार
By धीरज परब | Published: February 12, 2023 02:22 PM2023-02-12T14:22:28+5:302023-02-12T14:22:53+5:30
माजी नगरसेवक , राजकारणी , महापालिका आदींच्या भरवश्यावर न राहता मीरारोडच्या एका शाळेतील विद्यार्थ्यांनी सृष्टी - पेणकरपाडा भागातील कांदळवन स्वच्छतेला सुरवात केली आहे .
मीरारोड - माजी नगरसेवक , राजकारणी , महापालिका आदींच्या भरवश्यावर न राहता मीरारोडच्या एका शाळेतील विद्यार्थ्यांनी सृष्टी - पेणकरपाडा भागातील कांदळवन स्वच्छतेला सुरवात केली आहे . पहिल्याच दिवशी ह्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदळवनातील कचरा उचलला असला तरी डेब्रिसची समस्या मोठी आहे .
कांदळवन हे कायदे - नियम व न्यायालयांच्या आदेशा नुसार संरक्षित आहे . कांदळवनाचे महत्व दुर्लक्षित करून मीरारोडच्या सृष्टी ते पेणकरपाडा मार्गावरील जाफरी खाडी क्षेत्रातील कांदळवन मध्ये मोठ्या प्रमाणात कचरा , डेब्रिसचा भराव केला जात असून त्यात काही बेकायदा बांधकामे देखील झाली आहेत . येथे लहान मोठ्या टेम्पोतून नियमित डेब्रिस टाकले जाते . महापालिका बेकायदा घातक प्रदूषित सांडपाणी बेकायदा सोडत आहे .
पर्यावरणाचा ऱ्हास व कचरा - डेब्रिसच्या भरावाने होणारी अस्वच्छता पाहून पेणकरपाडा मधील प्रेमा लक्ष्मण विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीच पालिका व राजकारणी यांच्यावर भरवसा न ठेवता स्वतःच कांदळवन मध्ये स्वच्छता मोहीम सुरु केली आहे .
शनिवारी ८ वी व ९ वी च्या सुमारे १०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी कांदळवन मधील कचरा उचलल्याची माहिती शाळेचे संचालक दीपेश गावंड यांनी दिली . कांदळवन मध्ये टाकलेला बंदी असलेले प्लास्टिक व इतर कचरा विद्यार्थ्यांनी गोळा करून सफाई केली . मोहिमेत विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षक , पर्यावरणासाठी कार्य करणारे स्थानिक तरुण रितेश पाटील आदी सहभागी झाल्याचे गावंड म्हणाले .
पर्यावरणाचा रोज डोळ्या देखत होत असलेला ऱ्हास पाहून त्याच्या संरक्षणाची व स्वच्छतेची भावना जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकात निर्माण होणे गरजेचे आहे . मुळात पर्यावरण संरक्षण हि प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे अशी भावना विद्यार्थी व शिक्षकांनी बोलून दाखवली .
एरव्ही माझी वसुंधरा , स्वच्छता आणि सुशोभीकरणचा दिखावा करणारे माजी नगरसेवक , राजकारणी व पालिका प्रशासन मात्र कांदळवनात टाकला जाणारा कचरा , डेब्रिस कडे कमालीची डोळेझाक करत आहेत . प्रशासन व राजकारणी यांनी पर्यावरणाच्या संरक्षणा कडे दुर्लक्ष करणे हे शहर व नागरिकांच्या आरोग्यासाठी चिंताजनक असल्याचे यावेळी रितेश पाटील यांनी सांगितले .