एसआरपीएफच्या रायफली ‘पळवल्या’

By Admin | Published: February 5, 2016 02:49 AM2016-02-05T02:49:02+5:302016-02-05T02:49:02+5:30

घातपात कारवायांच्या पार्श्वभूमीवर हायअलर्ट असताना कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची सुरक्षा धोक्यात असल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी पहाटे उघडकीस आला.

SRPF recovered 'rifles' | एसआरपीएफच्या रायफली ‘पळवल्या’

एसआरपीएफच्या रायफली ‘पळवल्या’

googlenewsNext

कल्याण : घातपात कारवायांच्या पार्श्वभूमीवर हायअलर्ट असताना कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची सुरक्षा धोक्यात असल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी पहाटे उघडकीस आला. या वास्तूच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते राज्य राखीव सुरक्षा बलाचे (एसआरपीएफ) पोलीस कर्मचारी या ठिकाणी चक्क निद्रावस्थेत असल्याचे बाजारपेठ पोलिसांच्याच गस्तीदरम्यान समोर आले. शहर पोलिसांनी या पोलीस कर्मचाऱ्यांच्या रायफली उचलून नेल्या तरी त्यांना याचा अजिबात थांगपत्ता लागला नाही.
कल्याणमधील चार तरुण इसिस या दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याने हे शहरदेखील सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे. या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक आणि अतिसंवेदनशील असलेल्या कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर सुरक्षा यंत्रणांना अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
त्यानुसारच येथे एसआरपीच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सूर्यवंशी
हे पथकासह गुरुवारी पहाटेच्या सुमारास दुर्गाडी परिसरात गस्त घालत असताना किल्ल्याच्या सुरक्षेची जबाबदारी असणारी एसआरपीची १७ जणांची तुकडी गाढ झोपेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या निष्काळजीपणावर संतप्त झालेल्या पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जवान झोपलेल्या कंटेनरमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या रायफली उचलून घेतल्या. तरीही, त्या जवानांना याचा थांगपत्ता लागला नाही. सकाळी जाग आल्यावर आपल्या रायफली जागेवर नसल्याचे कळताच जवानांची एकच तारांबळ उडाली. याबाबत, तक्रार नोंदवण्यासाठी त्यांनी बाजारपेठ पोलीस ठाणे गाठल्यानंतर प्रकरणाचा उलगडा झाला. दरम्यान, रायफली नेणारे शहर पोलीस आणि एसआरपी यांच्यात शीतयुद्ध पेटल्याचे समजते.

Web Title: SRPF recovered 'rifles'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.