SSC Result: दिया गोस्वामीने व्यंगावर मात करुन मिळवले ९५.८० टक्के गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 03:12 PM2020-07-30T15:12:10+5:302020-07-30T15:13:19+5:30
दिया ही विद्यार्थीनी प्रथम आली असून त्यांच्या घरातले दोन्ही पालक हे कर्णबधिर असून तीला एक मोठी बहीण आहे.
- अनिकेत घमंडी
डोंबिवली: डोंबिवली येथील रोटरी सेवा केंद्र संचालित, रोटरी स्कूल ऑफ डेफ (कर्णबधिर) शाळेचा निकाल यंदा १०० टक्के लागला असून शाळेचे १३ विद्यार्थी चांगल्या गुणाकांनी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये व्यंगावर मात करून दिया गोस्वामी या विद्यार्थिनीने ९५.८० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळेच्या इतिहासात नोंद व्हावी असा हा प्रसंग असल्याचे शाळेचे अध्यक्ष ओमप्रकाश धुत यांनी सांगितले. दियासह ६ मुले डिस्टीन्क्शंनमध्ये उत्तीर्ण झाली असून अन्य दोघे प्रथम, पास क्लासमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
मुख्याध्यापिका अपेक्षा ठाकुर यांनी सांगितले की, दिया ही विद्यार्थीनी प्रथम आली असून त्यांच्या घरातले दोन्ही पालक हे कर्णबधिर असून तीला एक मोठी बहीण आहे. दियाचे वडील जगदीश गोस्वामी हे याच शाळेतले माजी विद्यार्थी असून ते इंजिनीयर आहेत. दियाचा शांत असून मनमिळावू आहे. एकाग्र असल्याने ती अभ्यासात पुढे असते. एखादी समस्या सुटली नाही तर ती अस्वस्थ होते, त्यामुळे खाणाखुणा करून ती तीच्या अभ्यासातील अडचणी समजून घेते. त्याशिवाय तिचे समाधान होत नाही.
साधारणपणे ११ ते ५ वाजेपर्यंत शाळा असते, त्या मुलांना दियाची आई घरी शिकवते, त्यामुळे काही मुले ही आवर्जून दियाच्या घरी जातात. अनेकदा दियाची आई सुद्धा शाळेत येते, आणि दियाला अभ्यासात येणा-या समस्यांसंदर्भात शिक्षकांशी चर्चा करते. दियाला अभ्यास करण्याची आवड आहे. या मुलांना शालांत परिक्षेला ७वीचे अंकगणित असते. पण तरीही यंदाच्या बॅचला ते खुप सोपे गेले, त्यामुळे यंदाचा निकाल तुलनेने चांगला लागल्याचे कौतुक असल्याचे त्यांनी सांगितले. दियाला सगळेच विषय खुप आवडतात, शिक्षणात रस घेऊन ती कार्यरत असते. त्यामुळे आम्हाला देखिल त्या सगळया विद्यार्थ्यांना शिकवायला आनंद मिळत असल्याचे त्या म्हणाल्या.
दिव्याचे वडील जगदीश यांनी दियाच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला, ते म्हणाले की, तीची स्वप्न मोठी होण्याची असून शालांत परिक्षेत यश मिळाल्याने तीचा पुढे जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. आता पुढे काय कसे करायचे, करियरच्या संधी याबाबत आमच्या अपेक्षा वाढल्या असून आमच्या सगळयांचा आत्मविश्वास वाढला आहे. याखेरीज शाळेत यंदाच्या शालांत परिक्षेत द्वितीय क्रमांक श्रावणी दरेकर हीने मिळवला असून तीला ८६.२० टक्के गुण मिळाले असून अक्षण राणे याने तृतीय क्रमांक मिळवला असून त्याला ८४.८० टक्के मिळाले आहेत. अन्य विद्यार्थ्यांना देखील चांगले गुणांकन मिळाले असून शाळा प्रशासन या निकालाबद्दल समाधानी असल्याचे धुत म्हणाले.