एसटी आगारात जुगाराचा अड्डा
By admin | Published: January 12, 2017 07:05 AM2017-01-12T07:05:09+5:302017-01-12T07:05:09+5:30
अंबरनाथ रेल्वे स्थानकाला लागून असलेले एसटी आगार बंद झाल्याने त्याचा ताबा आता जुगार खेळणाऱ्यांनी घेतला आहे.
अंबरनाथ : अंबरनाथ रेल्वे स्थानकाला लागून असलेले एसटी आगार बंद झाल्याने त्याचा ताबा आता जुगार खेळणाऱ्यांनी घेतला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा क्लब सुरू आहेत. आता या जुगार खेळवणाऱ्यांनी भररस्त्यावर जुगार मांडून नागरिकांची फसवणूक सुरू केली आहे. या जुगाराच्या अड्ड्यामुळे संपूर्ण परिसरात जुगारावर देखरेख ठेवणाऱ्या गुंडप्रवृत्तीच्या नागरिकांचा वावर वाढला आहे. त्याचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
अंबरनाथ रेल्वे स्थानकाला लागूनच एसटी आगार आहे. चार वर्षांपासून आगार बंद असल्याने त्या जागेचा वापर आता जुगाऱ्यांनी सुरू केला आहे. या आगाराची संरक्षक भिंत तोडून क्लबमध्ये जाण्यासाठी मार्ग तयार केला आहे. स्थानक परिसरातच मोठ्या प्रमाणात जुगाराचे अड्डे मांडल्याने ही वस्ती सर्वसामान्य नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. बंद खोलीत सुरू राहणारा जुगार आता उघड्यावरदेखील सुरू झाला आहे. नागरिकांची फसवणूक करण्यासाठी जुगार रस्त्यावर मांडण्यात आला आहे. या जुगाराच्या ठिकाणी चारही बाजूंना जुगार खेळवणारे गुंड उभे असतात.
खेळणारे मोठ्या प्रमाणात पैसे जिंकत आहे, हे लक्षात आल्यावर रस्त्यावरून जाणारे सर्वसामान्य नागरिकही जुगार खेळू लागले आहेत. जुगार खेळणाऱ्यांपैकीच काही जण त्यांचेच असल्याने सर्वसामान्य नागरिकांची त्यात फसवणूक केली जात आहे. पत्त्यांचा हा खेळ नागरिकांची लुबाडणूक करीत आहे. त्यात कोणी व्यक्ती पैसे जिंकली तरी तिला त्या ठिकाणाहून जाऊ दिले जात नाही. जाण्याचा प्रयत्न केल्यास मारहाण करण्यासही हे गुंड मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे या जुगाराच्या अड्ड्यावर बंदी घालण्याची मागणी नागरिक करीत आहेत. (प्रतिनिधी)