वाड्यात मध्यरात्री एसटी बस खाक
By Admin | Published: April 8, 2016 01:23 AM2016-04-08T01:23:48+5:302016-04-08T01:23:48+5:30
येथील आगारातील बसला बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत बस जळून खाक झाली असून तिच्या शेजारील दोन गाड्यांनाही या आगीची झळ लागून महामंडळाचे २० लाखांचे नुकसान झाले
वाडा : येथील आगारातील बसला बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत बस जळून खाक झाली असून तिच्या शेजारील दोन गाड्यांनाही या आगीची झळ लागून महामंडळाचे २० लाखांचे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्कीटने लागली असल्याची शक्यता आहे.
वाडा आगारातील गॅरेज मधून दुरूस्तीचे काम पूर्ण करून ही बस आगरातील पेट्रोल पंपा शेजारी उभी होती. बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास या बसला अचानक आग लागली. संपूर्ण बसने पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. या बस शेजारीच उभ्या असलेल्या दोन गाड्यांना या आगीची झळ लागली मात्र कर्मचाऱ्यांनी धावपळ करून बाकीच्या बसेस दूर नेल्यामुळे अनर्थ टळला.
ही आग आटोक्यात आणण्यासाठी किरवली येथील आयुष वॉटर सप्लायर यांनी पाणी पुरवून इतरांच्या सहकाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला. या आगीचे निश्चित कारण कळले नसले तरी वाडा आगाराचे २० लाखाचे नुकसान झाल्याची माहिती आगार प्रमुख मधुकर धांगडा यांनी दिली. या परीसरात वारंवार आगी लागत असल्याने व अग्निशमनाची कोणतीही व्यवस्था जवळपास नसल्याने ती निर्माण करण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याबाबत आता कोणती कारवाई होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.