एसटी बसचालकाचा उपोषणाचा इशारा
By admin | Published: May 1, 2017 05:54 AM2017-05-01T05:54:10+5:302017-05-01T05:54:10+5:30
कल्याण एसटी बस डेपो व्यवस्थापनाने आकस ठेवून कारवाई केल्याच्या निषेधार्थ बसचालक महादेव म्हस्के यांनी १८ मे पासून
कल्याण : कल्याण एसटी बस डेपो व्यवस्थापनाने आकस ठेवून कारवाई केल्याच्या निषेधार्थ बसचालक महादेव म्हस्के यांनी १८ मे पासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
कल्याण-पडघा मार्गावर एसटी महामंडळाची बस धावते. २०१२ मध्ये बसचालक ए. बी. वारे यांना प्रवाशांनी मारहाण केली होती. त्याच्या निषेधार्थ म्हस्के यांच्या पुढाकाराने संप झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर आरोप ठेवून व्यवस्थापनाने त्यांना सेवेतून बडतर्फ केले. या कारवाईविरोधात म्हस्के यांनी औद्योगिक कामगार न्यायालयात धाव घेतली होती. म्हस्के यांच्या बडतर्फीच्या कारवाईस न्यायालयाने ४ एप्रिल २०१७ ला स्थगिती दिली. हा आदेश घेऊन म्हस्के डेपोत आले असताना त्यादिवशी रामनवमीचे कारण सांगून डेपो व्यवस्थापनाने त्यांचा आदेश घेतला नाही. त्याचबरोबर त्यांची वाडा बस स्थानकात बदली केली. मात्र, बदलीच्या म्हस्के यांच्या वडिलांचा उल्लेख चुकीचा होता. त्यांच्या वडिलांचे नाव पंढरीनाथ असून, आदेशात ‘पांडुरंग’ असा नामोल्लेख आहे. तसेच म्हस्के हे चालक असताना वाहक असे म्हटले आहे.
म्हस्के हे महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे डेपो व्यवस्थापनाने त्यांच्याविरोधात आकस ठेवून कारवाई केली आहे. त्याला न्यायालयाने स्थगिती दिली असताना न्यायालयाचा आदेशही प्रशासनाकडून मानला जात नाही. त्यामुळे डेपोचे विभाग नियंत्रणक, डेपो व्यवस्थापक, स्थानकप्रमुख यांच्याविरोधात बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)
अन्य संघटनांचाही पाठिंबा
अन्य कामगार संघटनांनीही उपोषणाला पाठिंबा दिला आहे, असे म्हस्के यांनी सांगितले. तसेच म्हस्के यांच्यावरील अन्यायाविरोधात अन्य चालकही उपोषणाला बसणार आहेत.