कार्तिकी एकादशीसाठी लालपरी सज्ज; ठाणे विभागातून जादा १३९ बसेस सोडणार
By जितेंद्र कालेकर | Published: November 22, 2023 07:24 PM2023-11-22T19:24:33+5:302023-11-22T19:25:32+5:30
आषाढीप्रमाणेच कार्तिकी एकादशीलाही विठुरायाच्या दर्शनासाठी पांडुरंगाच्या भक्तांना आस लागली आहे.
ठाणे : आषाढीप्रमाणेच कार्तिकी एकादशीलाही विठुरायाच्या दर्शनासाठी पांडुरंगाच्या भक्तांना आस लागली आहे. हीच बाब लक्षात घेत ठाणे विभागीय एसटी महामंडळाची लालपरीही त्यासाठी सज्ज झाली आहे. कार्तिकी एकादशीसाठी ठाणे जिल्ह्यातून जादा १३९ एसटी बसचे नियोजन केले आहे. त्यानुसार २० नोव्हेंबरपासून काही बस पंढरपूरला रवानाही झाल्या आहेत.
लाखो वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून पंढरपुरात दाखल होत असतात. येत्या २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन ठाणे विभागाकडून ठाणे बसस्थानक, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, डोबिंवली, वाडा आणि शहापूर, येथून जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच २० ते २३ नोव्हेंबर दरम्यान ठाणे जिल्ह्यातील विविध बस आगारांतून १३९ जादा बसचे नियोजन केले आहे. यामध्ये ७४ ग्रुप बुकिंग आणि १४ ऑनलाइन आरक्षण केलेल्या अशा ९१ बस रवाना होणार आहेत. या व्यतिरिक्त ऑनलाइन आरक्षणच्या ४८ बस सोडण्यात येणार आहेत. त्यातील अनेक बस २० नोव्हेंबरपासून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.
२४ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत पंढरपूर येथून परतीचा प्रवास सुरू होणार आहे. ठाणे आगार एक येथून दोन ग्रुप बुकिंग, ठाणे आगार दोन येथून ९ तर भिवंडीतून ४, शहापूर एक आणि विठ्ठलवाडी येथून ९ तसेच वाडा आगारातून सर्वाधिक ६५ जादा बस सोडल्या आहेत. या सोडलेल्या सर्व जादा गाड्यांचे आरक्षण एक महिना अगोदर या पद्धतीने उपलब्ध करू देण्यात आले होते. परतीचे आणि ग्रुप पद्धतीचे आरक्षण करण्याची व्यवस्था प्रत्येक बसस्थानकावर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सरकारी योजनांचा लाभ
यंदा राज्य शासनाकडून प्रवाशांकरिता ७५ वर्षेवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना व महिला सन्मान योजना या दोन सवलती जाहीर केल्यामुळे त्याचा लाभ कार्तिकी यात्रेकरिता जाणाऱ्या प्रवाशांनाही होणार आहे.
सोडण्यात आलेल्या बस
आगार ग्रुप बुकिंग ऑनलाइन आरक्षण
- वाडा ६५ - ००
- ठाणे एक- ०२ - ००
- ठाणे दोन- ०३- ०६
- विठ्ठलवाडी ०४- ०५
- भिवंडी ०१ -०३
- शहापूर ०१- ००