गणेशोत्सवासाठी एसटीच्या बस गेल्या कोकणात; डोंबिवलीकर वाऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 12:27 PM2020-08-10T12:27:21+5:302020-08-10T12:27:29+5:30
कल्याण शिळ रस्त्यावरही वाहतूक कोंडी
- अनिकेत घमंडी
डोंबिवली: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मागणी वाढल्याने राज्य परिवहनच्या बसेस कोकणात विविध मार्गावर पाठवण्यात आल्या असून त्याचा परिणाम डोंबिवलीकर चाकरमान्यांचा प्रवासाच्या नियोजनावर झाला आहे. येथील बस फेऱ्या कमी झाल्या असून प्रवाशांची रांग वाढता वाढत आहे. आधी खासगी कर्मचा-यांसाठी रेल्वे सेवा सुरु नाही, त्यात बस फे-या अचानक कमी झाल्याने चाकरमान्यांची सोमवारी सकाळी त्रेधातिरपीट उडाली होती.
बसची वाट पहात उभ्या असलेल्या रांगा इंदिरा गांधी चौकातून सुरु होऊन बाजीप्रभु चौक, फडके पथ ते फतेह अली रस्त्यापर्यंत पोहोचल्या होत्या. शेकडो नागरिक त्यामुळे ताटकळले होते. बस येत नसल्याने राज्य परिवहन मंडळाचे नियंत्रक, अन्य कर्मचारीही प्रवाशांच्या प्रश्नांना उत्तर तरी काय देणार यापेचात अडकले होते. पहाटे ६ वाजल्यापासून रांगा लागलेल्या होत्या. विशेषत: मंत्रालयमार्गावर जाणा-या गाड्यांची संख्या रोडावली असल्याने समस्येत वाढ झाली होती. काही प्रवाशांनी ठाणेपर्यंत जाऊन तेथून पुन्हा बसची रांग लावून मुंबई गाठण्याचा पर्याय निवडला होता, तर काहींनी डोंबिवलीतच बसची वाट बघणे पसंत केले होते. त्यामुळे सकाळी ११ वाजेपर्यंत रांगा काही केल्या कमी झालेल्या नव्हत्या. त्यामुळे परिवहन मंडळाच्या कर्मचा-यांवर मात्र तणाव पडला होता. गणेशोत्सवात गाड्या सोडा पण आता जे नियोजन दोन महिन्यांपासून सुरु आहे त्याला फाटा देऊ नका. लोकल सेवा सगळयांसाठी सुरु झाल्यावर बस वाहतूकीकडे आपोआप मागणी कमी होईल, पण तोपर्यंत महामंडाळाने डोंबिवलीकरांना वा-यावर सोडू नये अशी मागणी रांगेत ताटकळलेल्या महिलांनी केली.
त्यात काही बस सकाळच्या वेळेत कल्याण शीळ मार्गावरील वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. पलावा जंक्शन, मानपाडा जंक्शन येथे वाहतूक कोंडी झाली होती. आठवडाभर झालेल्या पावसामुळे कल्याण शीळ रस्ताची चाळण झाली आहे. वाहतूकीचा वेग मंदावला असून त्याकडे वाहतूक पोलीसांचे आणि रस्त्याच्या कामाकडे राज्य रस्ते नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याने कोंडीचे प्रमाण वाढले असल्याची टिका वाहनचालकांनी केली.
आता तर अजून पूर्ण वाहतूक सुरु झालेली नसून जेव्हा ती होईल तेव्हा तर कहर होईल. सध्या पलावा ते शीळफाटा अवघ्या १२ ते १५ मिनिटांसाठी सुमारे दिड दोन तास लागत आहेत. त्याची दखल घेत ही वाहतूक कोंडी व रखडलेली खड्डे बुजवण्याची कामे यासंदर्भात आमदार प्रमोद पाटील यांनी एमएसआरडीसीच्या अधिका-यांची शुक्रवारी भेट घेतली होती परंतू तरीही अद्यापर्यंत काहीही फरक पडला नसल्याने अधिका-यांमध्ये इच्छाशक्तीचा आभाव असल्याची टिका नागरिकांनी केली.