एसटी कर्मचाऱ्यांचा १०० टक्के बंद; मागण्या मान्य करण्यासाठी कार्यशाळेचे कर्मचारी बंदमध्ये सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 02:26 PM2021-11-08T14:26:15+5:302021-11-08T14:38:02+5:30
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला अद्यापही राज्य शासनाकडून सकारात्मक चर्चा झालेली नाही.
ठाणे - विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी मागील काही दिवसांपासून बंदचे हत्यार उपसले आहे. परंतु ठाणे जिल्ह्यात त्याची झळ खऱ्या अर्थाने सोमवारपासून बसल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील आठही आगारातून एकही बस रस्त्यावर धावली नाही. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले, तर या संपात ३२०० पैकी २७०० कर्मचारी बंदमध्ये सहभागी झाल्याची माहिती एसटी विभागाच्या वतीने देण्यात आली. तर या बंदला भाजपा पाठोपाठ आता मनसेने देखील पाठिंबा दिला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला अद्यापही राज्य शासनाकडून सकारात्मक चर्चा झालेली नाही. त्यामुळे आता हळू हळू एसटी कर्मचारी १०० टक्के काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. ठाण्यातील डेपो १ आणि डेपो दोन मध्ये रविवार पासून एकही बस बाहेर पडलेली नाही. तर रविवारी दुपारपासून विठ्ठलवाडी डेपोतून कामगारांनी काम बंद आंदोलन सुरु केले. त्यानंतर रविवारी मध्यरात्री पासूनच जिल्ह्यातील आठही डेपोतून कामगारांनी १०० टक्के बंदचे हत्यार उपसले आहे. या बंदमुळे जिल्ह्यातील आठ डेपोतून ४९० पैकी एकही बस रस्त्यावर उतरली नाही. या बंदमध्ये एसटीच्या ३२०० पैकी २७०० कामगार सहभागी झाले आहेत. उर्वरीत १० टक्के स्टाफ हा कार्यालयात असल्याने ते या बंदमध्ये सहभागी झाले नसल्याचे दिसून आले.
दरम्यान दिवाळीची सुट्टी असल्याने अनेक प्रवासी आपल्या गावाला निघाले होते. परंतु सोमवारी या प्रवाशांची घोर निराशा झाली. आता बस येईल थोडय़ा वेळाने बस येईल असे प्रवाशांना वाटत होते. त्यामुळे खोपट आणि वंदना डेपोत अनेक प्रवासी बसची वाट पाहत असल्याचे दिसून आले. परंतु बस न आल्याने काहींनी परतीचा मार्ग स्विकारला तर काहींनी खासगी बसने आपले गाव गाठण्याचा प्रयत्न केला. एसटीच्या कामगारांनी पुकारलेल्या या बंदमुळे एसटीचे दीड दिवसात १ कोटी १० लाखांचे नुकसान झाले आहे.
कार्यशाळेतील कामगारांचेही काम बंद
ठाणे एसटीचे कळवा येथे कार्यशाळा आहे. या कार्यशाळेत १६५ कामगार कामावर असतात. परंतु कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमध्ये कार्यशाळेतील १५९ कामगार सहभागी झाले आहेत. त्यांनी देखील कार्यशाळेच्या गेटवर काम बंद आंदोलन करीत घोषणा बाजी केली.
भाजप पाठोपाठ मनसेचाही बंदला पाठींबा
एक दिवसापूर्वीच भाजपाने एसटी कामगारांच्या बंदला पाठींबा जाहीर केला आहे. त्यानंतर सोमवारी मनसेने देखील या बंदला पाठींबा देत या आंदोलनात सहभागी झाले. खोपट येथील डेपो जवळ कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनात मनसेचे पदाधिकारी सहभागी झाले होते