एस.टी. बसचे प्रवासी वाढताहेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:27 AM2021-06-10T04:27:06+5:302021-06-10T04:27:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लागू केलेला लॉकडाऊन रुग्णसंख्या कमी होताच शिथिल करण्यात आला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लागू केलेला लॉकडाऊन रुग्णसंख्या कमी होताच शिथिल करण्यात आला आहे. कल्याण बस डेपोत बसेस वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासी वाढत असले तरी दुसरीकडे लाईफलाईन म्हणून ओळख असलेल्या लोकल रेल्वेतून सामान्य प्रवाशांना प्रवासाची मुभा नाही; त्यामुळे रेल्वेमध्ये गर्दी कमी आहे. परिमाणी रस्ते वाहतुकीवर त्याचा परिणाम दिसून येत आहे.
कल्याण रेल्वे स्थानक हे जंक्शन आहे. आधी मुंबई ते कसारा, मुंबई ते कर्जत, दिवा-पनवेल, दिवा-वसई या रेल्वेगाड्या येथून चालविल्या जात होत्या. रेल्वेच्या १५०० फेऱ्या आधी व्हायच्या, त्यात आता घट झाली आहे. कोरोनाच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ७५० फेऱ्या चालविल्या जात आहेत. प्रवासी कमी आणि फेऱ्या जास्त; त्यामुळे रेल्वेला मोठा आर्थिक फटका सहन करून सेवा द्यावी लागत आहे. दुसरीकडे, लॉकडाऊनच्या काळात कल्याण बस डेपोला महिन्याला अडीच कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागत होता. प्रवासी घटले, फेऱ्या कमी, त्यामुळे बसेस कमी चालविल्या जात होत्या. डेपोतून नगर, नाशिक फेऱ्यांतून चांगले उत्पन्न मिळायचे. त्या फेऱ्या आता कमी आहेत. अनलॉकमध्ये बसेसची संख्या आणि फेऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे बसची प्रवासी संख्या वाढते आहे. रेल्वेत सामान्यांना प्रवासाची मुभा नसल्याने सगळा ताण बस वाहतुकीवर आला आहे. बसेसची संख्या कमी असल्याने खासगी रिक्षा, टॅक्सी, ओला आणि उबेर टॅक्सीचालकांची चंगळ झाली आहे.
-------------------------
अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास
रेल्वे प्रवास
१. सरकारी कार्यालयात कामाला आहे. माझे काम अत्यावश्यक सेवेशी निगडित असल्याने रेल्वेचा प्रवास करावा लागतो.
- सुहास सरक
२. मी एका मुंबईच्या लॅबमध्ये कामाला आहे. रेल्वेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी प्रवासाची मुभा दिली आहे. रेल्वेला गर्दी कमी असते.
- प्रतिमा जाधव
-------------------------
बस प्रवासी
१. मी एका खासगी रुग्णालयात काम करते. मला रोज बसने नवी मुंबई गाठावी लागते. बस सोयीचे पडते. मात्र गर्दी असते.
सविता कोंडे
२. मी भिवंडी पडघा रोडवरील वेअर हाऊसमध्ये कामाला आहे. मला रिक्षा आणि ओलाचा प्रवास परवडत नाही. त्यात वेतनकपात झाली आहे. त्यामुळे रोज बसने प्रवास करतो.
- प्रतीक शुक्ला
---------------------------
रेल्वेला गर्दी कमी
रेल्वेने प्रवास करण्याची मुभा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या रेल्वेगाड्यांना गर्दी कमी आहे. यापूर्वी सर्वसामान्य प्रवाशांना प्रवासाची मुभा दिली होती. त्याचे वेळापत्रक दिले होते. मात्र गर्दी वाढली आणि सोबतच रुग्णांची संख्याही वाढली. त्यामुळे पुन्हा निर्बंध लागू होऊन प्रवासावर मर्यादा आल्या.
---------------------------
भिवंडी, पनवेल मार्गावर बसमध्ये गर्दी
कल्याण बस डेपोतून भिवंडी, पनवेल मार्गावर प्रवाशांची जास्त झुंबड असते. कल्याणहून पनवेलला रेल्वेने प्रवास करता येत नाही; कारण ठाणे किंवा मुंबईहून हार्बर लाईनने पनवेल गाठणे हा उलटा प्रवास आहे. त्यामुळे बसने पनवेल सोयीचे पडते. भिवंडी उपनगरीय रेल्वेने जोडली गेली नसल्याने सामान्यांची मदार बसप्रवासावर आहे.
----------------------------
प्रवासी वाढतील
लॉकडाऊनमध्ये प्रवासी भारनियमन घटले होते. आता बसेसची संख्या वाढविणार आहे. फेऱ्याही वाढविल्या जात आहेत. त्यामुळे प्रवासी वाढतील, अशी अपेक्षा आहे.
- विजय गायकवाड, कल्याण बस डेपो व्यवस्थापक
----------------------------
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता रेल्वे सेवा असल्याने प्रवासी कमी आहेत. त्यामुळे गाड्यांना गर्दी कमी आहे.
- रेल्वे प्रशासन
-----------------------------
कल्याण बस डेपो
चालविणाऱ्या जाणाऱ्या बसेस- २५
बसेसच्या फेऱ्या- १००
बसमधून प्रवास करणारे प्रवासी- ६० हजार
-----------------------------
कल्याण रेल्वे स्थानक
रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या - ७५०
प्रवासी संख्या- २ लाख
-----------------------------