डिझेलसाठी पैसे नसल्याने एसटी सेवा बंद, पाच दिवसांचे ६५ लाख थकल्याने महामंडळावर नामुष्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:35 PM2021-03-23T16:35:10+5:302021-03-23T16:36:38+5:30
यानंतर आधीच डबघाईला आलेल्या एसटीला १३ ते १४ लाखांचा फटका बसल्याची माहितीही समोर आली आहे. त्यातही कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांनादेखील घरी जा असे सांगण्यात येत होते.
ठाणे: आधीच कोरोनामुळे एसटीच्या सेवेला (ST service) फटका बसला आहे. त्यातच आता मागील पाच दिवसाचे डिझेलचे पैसे न दिल्याने ठाण्यातून सुटणाऱ्या शेकडो एसटी खोपट आगारात थांबल्याचे दिसून आले आहे. डिझेल पंप चालकाचे पाच दिवसांचे ६५ लाख न दिल्याने एसटी महामंडाळवर ही नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे आरक्षण केलेल्या प्रवाशांना आरक्षण रद्द करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. तर काही प्रवासी सकाळपासूनच डेपोत ताटकळत बसल्याचे दिसून आले. (ST service closed due to lack of money for diesel in thane)
यानंतर आधीच डबघाईला आलेल्या एसटीला १३ ते १४ लाखांचा फटका बसल्याची माहितीही समोर आली आहे. त्यातही कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांनादेखील घरी जा असे सांगण्यात येत होते.
ठाणे जिल्ह्यातील एक नंबरचा डेपो म्हणून खोपट डेपोची ओळख आहे. परंतु या डेपोवर सोमवारपासून डिझेल नसल्याने एसटीच्या ४० ते ५० बसेस येथे उभ्या असल्याचे दिसून आले. यामध्ये शिवनेरी, शिवशाही बसेसचादेखील समावेश होता. या डेपोतून कोकणातील सर्व मार्गांवर, नाशिक, शिर्डी, नगर, सातारा, कराड, कोल्हापूर, बेळगाव, वडूज, दहीवडी, अलिबाग, पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर आदींसह राज्यातील इतर प्रमुख मार्गांवर बसेस धावत असतात. परंतु सोमवारी दुपारनंतर या डेपोत शुकशुकाट दिसून आला. तर १३ ते १५ मुक्कामी आलेल्या बसेसनांदेखील याचा फटका बसल्याचे दिसून आले.
डिझेल संपले असल्याने बसेस रस्त्यावर धावत नव्हत्या. परंतु प्रवाशांना हे कारण सांगितले जात नव्हते. उलट ज्या-ज्या प्रवाशांनी मंगळवारचे आरक्षण केले होते, त्यांना ते रद्द करण्याचे सांगितले गेले. त्यामुळे आरक्षण केंद्रावरदेखील काहीशी गर्दी पहावायस मिळाली.
दुसरीकडे मागील पाच दिवसांचे डिझेल पंप चालकाचे ६५ लाखांची देणी न दिल्याने डिझेल पंप चालकाने हा असहकार पुकारल्याचे दिसून आले आहे. मार्च अखेर असल्याने वैधानिक देणी देणे महत्वाचे ठरविण्यात आल्यानेच डिझेल पंप चालकाचे देणी देणे शक्य झाले नसल्याची माहिती पुढे आली आहे.
कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांना पाठविले घरी
नेहमी प्रमाणो कामावर आलेले कर्मचारी बस मिळावी म्हणून वाट पाहत होते. परंतु त्यांना बसचा ताबा मिळाला नाही. उलट त्यांना जबरदस्तीने घरी जाण्याच्या सुचना खोपट विभागाच्या वतीने देण्यात आल्या. त्यामुळे कर्मचारी वर्गातदेखील संताप दिसून आला. आधीच कोरोनामुळे पगारात कपात झालेली असतांना पुन्हा एक दिवस घरी बसल्यास त्या दिवसाचा पगारही कापला जाण्याची भिती या कर्मचाऱ्यांमध्ये दिसून आली.
रोज २० हजार लीटर डिझेल
यापूर्वी ठाणे डेपोतील एसटींसाठी १० ते १२ हजार लीटर रोजच्या रोज डिझेल लागत होते. परंतु, आता बाहेरील आगारातील येणाऱ्या बसेससाठीदेखील डिझेल दिले जात असल्याने दिवसाला २० हजार लीटर डिझेल लागत असल्याची माहिती एसटीच्या सुत्रंनी दिली. त्यामुळेदेखील हा तुटवडा निर्माण होऊन खर्चही वाढल्याचे सांगितले जात आहे.
१४ लाखांचा फटका
डिझेल पंप चालकाचे ६५ लाख थकविल्याने एसटीच्या खोपट डेपोतून निघणाऱ्या विविध मार्गावरील बसेस मंगळवारी बाहेरच न पडल्याने त्याचा फटका उलट एसटी महामंडळालाच बसल्याचे दिसून आले. एसटीला एका दिवसात सुमारे १४ लाखांच्या उत्पन्नाला मुकावे लागले आहे.
प्रवाशांचे हाल
खोपट डेपोतून एकही एसटी बाहेर पडत नसल्याने त्याचा फटका प्रवाशांना देखील बसला. होळीसाठी कोकणात जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना आपले आरक्षण रद्द करण्याची वेळ आली. तर अनेक प्रवासी आता बस येईल थोड्या वेळाने बस येईल, म्हणून ताटकळत डेपोत बसून होते.
पंप चालकाचे पाच दिवसांचे पैसे न दिल्याने हा प्रकार घडला. परंतु त्याचे देणो दिवसभरात दिले जाणार असून एसटीची सेवा पुन्हा सुरु होणार आहे, असे विभागीय नियंत्रक विनोदकुमार भालेराव यांनी सांगितले.