ST Strike : एसटी संप चिघळण्याची शक्यता; खोपट डेपोतील विश्रामगृहातून कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 03:40 PM2021-11-10T15:40:06+5:302021-11-10T15:41:50+5:30
ST Strike : ठाण्यातील खोपट आगारातील विश्रांती कक्षात आराम करणाऱ्या वाहकांची चक्क हाकालपट्टी करण्यात आल्याने आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
ठाणे - गेले अनेक दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी संपावर गेले असून त्यामुळे सामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. अहिंसक मार्गाने सुरू असलेल्या या एसटी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला आज एक वेगळेच वळण लागले असून एसटी कर्मचाऱ्यांना सरकार दरबारी किती महत्व आहे याची प्रचिती मिळते. आज ठाण्यातील खोपट आगारातील विश्रांती कक्षात आराम करणाऱ्या वाहकांची चक्क हाकालपट्टी करण्यात आल्याने आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे सरकारमध्ये विलनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी संपावर गेले असून आपली मागणी पूर्ण झाल्याशिवाय कामावर रुजू होणार नाही असा चंगच जणू त्यांनी बांधला आहे. कोरोनाकाळात आपल्या जीवाची बाजी लावत सरकारी कर्मचारी म्हणून आपण सेवा बजावली तेव्हा आपल्याला सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वागणूक दिली व कोरोना ओसरताच आपल्याला पुन्हा महामंडळाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे सापत्न वागणूक का दिली जात आहे असा थेट सवाल आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी विचारला आहे.
"सरकारने कितीही बळाचा वापर केला तरीही हे आंदोलन सुरू राहील"
आपण सर्वजण अत्यंत संयम राखत आंदोलन करत असताना सरकारने मात्र दडपशाहीने खोपट आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विश्रांती गृहाला टाळे ठोकण्याचा जुलूम का केला असा सवाल काहींनी केला. यात खेदाची गोष्ट म्हणजे विश्रांती कक्षात आराम करत असलेल्या बस वाहकांना आहेत त्या परिस्थितीत बाहेर हाकलण्यात आले ज्याचा निषेध सर्वच थरातून होत आहे. सरकारने कितीही बळाचा वापर केला तरीही हे आंदोलन असेच सुरू राहील अशी गर्जना अनेक कर्मचाऱ्यांनी केली.