ST Strike : खासगी वाहनांतून प्रवासी वाहतूक सुरु, एसटी संपामुळे उपाययोजना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2018 05:24 PM2018-06-08T17:24:59+5:302018-06-08T17:24:59+5:30
ठाणे- एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाची प्रवाशांना झळ लागू नये म्हणून जिल्हा प्रशासन आणि परिवहन विभाग सज्ज झाला असून खासगी बसेस, शाळेच्या, कंपन्यांच्या बसेस तसेच इतर खासगी वाहनांतून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. संप सुरु असेपर्यंत ही परवानगी राहील. या अनुषंगाने परिवहन विभागाने पोलीस, होमगार्ड तसेच पालिकांच्या परिवहन सेवांची पण मदत घ्यावी असे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले आहे.
आज या संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यास सांगण्यात आले. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी अनिल पवार, परिवहन अधिकारी, पोलीस तसेच पालिकांच्या परिवहन सेवांचे अधिकारी देखील उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी संप काळात सर्व संबंधित विभागांनी समन्वय ठेवावा असे सांगितले.
वाहतूक अंशत: विस्कळीत
ठाणे जिल्ह्यात आठ बस आगार आहेत. या आठही आगारांतून दररोज १ लाख ८५ हजार प्रवासी जा ये करतात. ठाणे तसेच भिवंडी ,शहापूर येथील कर्मचाऱ्यांच्या संपाचा संमिश्र प्रतिसादामुळे सकाळी ५ ते ६ या कालावधीत वाहतूक विस्कळीत झाली होती. पण नंतर ती टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आली. कल्याण, मुरबाड, वित्थ्लावादी ,वाडा येथील वाहतूक बर्याच अंशी व्यवस्थित सुरु आहे.
सर्व आगारांच्या ठिकाणी खासगी बसेस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शिवाय अडचण येऊ नये म्हणून पोलीस, एस टी महामंडळ अधिकारी, परिवहन अधिकाऱ्यांची टीम प्रत्येक डेपोत नियंत्रण करण्यासाठी तैनात करण्यात आल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले. यामध्ये वायुवेग पथकांचा समावेश सुद्धा असून प्रवाशांना काही अडचणी आल्यास किंवा कुणी या संपाचा फायदा घेऊन अवास्तव भाडे आकारात असल्यास ते लगेच कार्यवाही करतील.