कल्याण डेपोतून एसटी सुपरफास्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:48 AM2021-09-08T04:48:58+5:302021-09-08T04:48:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण एसटी डेपोतून धावत असलेल्या बसकरिता सगळेच मार्ग लांब पल्ल्याचे असल्याने बससंचलनात कोणत्याही प्रकारचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण एसटी डेपोतून धावत असलेल्या बसकरिता सगळेच मार्ग लांब पल्ल्याचे असल्याने बससंचलनात कोणत्याही प्रकारचे अडथळे नाहीत. त्यामुळे कल्याण डेपोतून धावणारी एसटी सुसाट आहे. कल्याण डेपोतून ७० बस धावतात. त्यापैकी बहुतांश बस या लांब पल्ल्याच्या मार्गांवर धावणाऱ्या आहेत.
कल्याण डेपोतून पुणे, औरंगाबाद, बीड, लातूर, सोलापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक आणि रत्नागिरी, अलिबाग आदी मार्गांवर बस चालवल्या जातात. हे मार्ग चांगल्या स्थितीत असल्याने तसेच त्यावर खड्ड्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह बसचालकाला खड्ड्यांचा त्रास होत नाही. तसेच त्यांचे मार्गही बदलण्याची वेळ डेपो व्यवस्थापनावर अद्याप तरी आलेली नाही. गाड्या जुन्या आहेत. याचे समायोजन प्रवासी वर्गास करावे लागत आहे.
--------------------------------------------
आगारातून सुरू असलेल्या बस
कल्याण-पुणे
कल्याण-अलिबाग
कल्याण-अहमदनगर
कल्याण-नाशिक
कल्याण-अक्कलकोट
कल्याण-पालघर
कल्याण-वाडा
--------------------------------------------
कोणत्याच मार्गावरील फेऱ्या बंद नाहीत
काही गाड्या या कोरोनाआधीच बंद केलेल्या होत्या. लांब पल्ल्याच्या मार्गावरील सर्व गाड्या सुरू आहेत. बस डेपोतून दररोज ७० बसेस चालविल्या जातात. त्यामध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांसह भिवंडी, पनवेल, टिटवाळा, बदलापूर या गाड्या चालविल्या जात आहेत. ७० पैकी १० गाड्या या देखभाल- दुरुस्तीअभावी कार्यशाळेत असू शकतात. त्याच एका दिवसापुरती फेरी रद्द होण्याची शक्यता असते.
--------------------------------------------
कोणतेच मार्ग वळविलेले नाहीत
लांब पल्ल्याच्या गाड्या धावत असून, मार्ग चांगले आहेत. त्यामुळे मार्ग वळविण्याची वेळ डेपो व्यवस्थापनावर आलेली नाही. केवळ ज्या कल्याण ग्रामीण भागात गाड्या धावतात त्या भागातील काही ठिकाणीच रस्ते खराब आहेत. तेही पावसामुळे. अन्यथा सर्व मार्ग योग्य स्थितीत आहेत. केवळ एक दिवस गांधारी पुलाचा खांब कमकुवत झाल्याची बाब समोर आल्याने कल्याण - पडघा मार्गावरील गांधारी मार्गाची वाहतूक वळविण्यात आली होती.
--------------------------------------------
एसटीचा खर्च वाढलेला नाही
लांब पल्ल्याच्या गाड्या असून, रस्त्यावर विशेष खड्डे नाहीत. त्यामुळे एसटी गाड्यांच्या देखभाल- दुरुस्तीचा खर्च वाढलेला नाही. एखादी गाडी खराब झाल्यास तिची रवानगी लगेच कार्यशाळेत केली जाते. बसेस ब्रेकडाऊन होण्याचे प्रमाण कमी आहे. बस मार्गावर आणण्यापूर्वी विशिष्ट किलोमीटर चालल्यावर तिची देखभाल-दुरुस्ती केली जाते. चालकाच्या तक्रारीनंतर लगेच दुरुस्ती केली जाते.
--------------------------------------------
कल्याण बस डेपोतील प्रवासी भारमान चांगले आहे. कोरोना काळातील निर्बंध शिथिल झाल्याने हे भारमान वाढले आहे. बस डेपोतून लाँग रूटच्या गाड्या जास्त सोडल्या जातात. कल्याण-अहमदनगर मार्ग, कल्याण-पुणे, कल्याण-नाशिक हे मार्ग चांगल्या स्थितीत आहेत. केवळ कल्याण-मुरबाड मार्गावरील वरप गावाजवळ रस्ता खराब आहे. मात्र त्यामुळे फेऱ्या बंद, मार्ग वळविणे आणि देखभाल - दुरुस्तीचा खर्च वाढणे हे प्रकार झालेले नाहीत.
- विजय गायकवाड, व्यवस्थापक, कल्याण बस डेपो.
--------------------------------------------