एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, बस फेऱ्यांमध्ये कमालीची घट, शेकडो प्रवासी ताटकळले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 01:03 PM2020-07-20T13:03:39+5:302020-07-20T13:11:44+5:30
कल्याण, डोंबिवली डेपोमध्ये सोमवारी सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये एसटी बसच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून आली. त्यामुळे मंत्रालयामध्ये व मुंबईत अन्य ठिकाणी कामाला जाणारे चाकरमानी चार तास ताटकळले.
- अनिकेत घमंडी
डोंबिवली : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांना कोरानाची लागण झाली आहे. काही कर्मचारी भीतीने कामावर येत नसल्याने तर काही जेवणाची आबाळ होत असल्याने कल्याण, डोंबिवलीच्या रुटवर येण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे कल्याण, डोंबिवली डेपोमध्ये सोमवारी सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये एसटी बसच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून आली. त्यामुळे मंत्रालयामध्ये व मुंबईत अन्य ठिकाणी कामाला जाणारे चाकरमानी चार तास ताटकळले.
सकाळी ८ वाजता रांगा लावून दुपारी १२ वाजेपर्यंत बस न मिळाल्याने त्यांच्यामध्ये नाराजी पसरलेली होती. एरव्ही डोंबिवलीमधून सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये १५० हून अधिक बस फे-या होत असत, परंतू सोमवारी १२ वाजेपर्यंत मत्रांलय, ठाणे, कल्याण आदी मार्गावर अवघ्या ५१ फे-या झाल्याची माहिती नियंत्रण कक्षामधून मिळाली.
तेथील अधिका-यांनी सांगितले की, आम्ही देखील प्रवाशांना उत्तर देऊन हैराण झालो आहोत. बसच्या फे-या कमी झाल्या आहेत हे वास्तव आहे. अनेक सहकार्यांना कोरोनाची लागण झाली, तर काहींच्या जेवणा, राहण्याची आबाळ झाली. तर काहीजण भीतीपोटी कामावरच येत नसल्याने ही स्थिती झाली आहे. सकाळपासून कल्याण डेपोमध्ये सुद्धा अशीच अवस्था झाल्याचे सांगण्यात आले.
प्रवासी संख्या भरपूर असून सगळ्यांना राज्य शासनाने लोकल प्रवासाची मुभा दिलेली नाही. त्यामुळे समस्या वाढली आहे. त्यातच मंत्रालयामधील काही विभागांना लोकलने जाण्याची सुविधा आहे तर काहींना नाही, त्यामुळे अन्य विभागांचे कर्मचारी रांग लावून उभे आहेत.
सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये १० वाजता मंत्रालय मार्गावर बस सुटली होती, त्यानंतर १२ वाजेपर्यंत बस नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. ६ वाजल्यापासू १२ वाजेपर्यंत मत्रांलय १६, मुंबईतील शासकीय रुग्णालये ३, ठाणे २०, कल्याण १२ अशा एकूण अवघ्या ५१ बस फे-या सोडण्यात आल्याने १२ नंतरही प्रवाशांच्या रांगा कमी झालेल्या नव्हत्या.
मंत्रालयामध्ये कामाला असून मला तेथे जाण्यासाठी सकाळपासून इंदिरा गांधी चौकामध्ये ९ वाजण्याच्या सुमारास उभा आहे. परंतू १२ वाजले तरीही मंत्रालय बसचा पत्ता नाही. कामावर जायचे कसे, कधी? हा मोठा प्रश्न आहे. आता दुपारच्या सत्रामध्ये बस कधी येणार हे बघावे लागेल - केतन वामन, प्रवासी,डोंबिवली.
आणखी बातम्या...
CoronaVirus News : धक्कादायक! मल्टीनॅशनल कंपनीत कोरोनाचा विस्फोट, २८८ कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह
दूध आंदोलनाला राज्यात सुरुवात, दगडाला अभिषेक घालून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण
रावणाने पहिले विमान उड्डाण केले, सिद्ध करण्याचा श्रीलंकेचा दावा
सरकारी कर्मचार्यांसाठी खूशखबर! नाईट शिफ्ट केली तर आता असा होणार फायदा...