होर्डिंग्जसाठी दर सहा महिन्यांनी द्यावे लागणार स्थैर्यता प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:44 AM2019-06-14T00:44:17+5:302019-06-14T00:44:36+5:30
महासभेत होणार धोरण निश्चित : मंजुरीची प्रतीक्षा, ठाणे महापालिकेचा पुढाकार
ठाणे : मागील वर्षी पुण्यात होर्डिंग्जच्या दुर्घटनेनंतर संपूर्ण राज्यातील विविध महापालिका हद्दीतील होर्डिंग्जचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर ठाणे महापालिकेनेही शहरातील होर्डिंग्जबाबत स्थैर्यता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पावले उचलली होती. परंतु, यावर आता खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानुसार प्रत्येक होर्डिंग्जसाठी दर सहा महिन्यांनी अशा प्रकारचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता पालिकेने धोरण निश्चित करण्याचे ठरविले असून यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.
मागील वर्षी पुण्यात जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुघर्टनेत चार जणांना आपला जीव गमावावा लागला होता. या घटनेनंतर ठाणे महापालिका प्रशासनाने या होर्डिंग्जबाबत महत्त्वाची पावले उचलली आहेत. ठाणे महापालिका प्रशासनाने आता शहरातील जाहिरात फलकांसाठी दर सहा महिन्यांनी स्थैर्यता प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात धोरणात्मक निर्णय १९ जूनच्या महासभेत घेतला जाणार आहे. पुण्यातील घटनेनंतर ठाणे महापालिका प्रशासनानेही शहरातील जाहीरात फलकांची तपासणी करून स्थैर्यता प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळेस संबंधीत ठेकेदारांनी महापालिकेकडे त्यानुसार प्रमाणपत्र सादर केले होते, असा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, त्यालाही सहा महिन्यांचा काळ पूर्ण झाला आहे.
बुधवारी मुंबईमध्ये जाहिरात फलक कोसळल्याची घटना घडली असून, त्यापाठोपाठ गुरुवारी सकाळी ठाणे स्थानकाजवळील एसटी महामंडळाच्या आगारातील जाहिरात फलक कोसळला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, त्यामुळे जाहिरातफलकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नेमकी ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने आता शहरातील जाहिरात फलकांसाठी
दर सहा महिन्यांनी स्थैर्यता प्रमाणपत्र देणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्लोबल वार्मिंगमुळे फलक धोक्यात
सद्यस्थीतीत वाढत चाललेल्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात बदल होत आहेत. पावसाळ्याव्यतिरिक्तही वारंवार वादळाचे प्रमाण वाढले आहे. बदलत्या वातावरणामुळे लोखंड गंजण्याची प्रक्रिया जलदगतीने घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जाहिरात फलकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नियमित निगा व देखभाल राखणे आवश्यक आहे. त्यामुळे जाहिरात फलकामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी शहरातील जाहिरात फलकांसाठी दर सहा महिन्यांनी स्थैर्यता प्रमाणपत्र बंधनकारक करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने या प्रस्तावात नमूद केले आहे.
प्रभाग समितीनिहाय खासगी जाहिरात फलकांची संख्या
प्रभाग समीती संख्या
कोपरी ०६
रायलादेवी ०१
कळवा १०
वागळे इस्टेट ३४
दिवा ३१
वर्तकनगर-लोकमान्य १०६
माजीवाडा २६४
नौपाडा ६५
उथळसर ३५
एकूण ५४३