प्रणवमुळे कल्याणमध्ये लवकरच स्टेडियम
By admin | Published: January 8, 2016 03:09 AM2016-01-08T03:09:20+5:302016-01-08T03:09:20+5:30
एकाच डावात वैयक्तिक एक हजार नऊ धावांचा विश्वविक्रम करणाऱ्या प्रणव धनावडेच्या अचाट कामगिरीने कल्याणकरांचे क्रिकेट स्टेडियमचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.
ठाणे : एकाच डावात वैयक्तिक एक हजार नऊ धावांचा विश्वविक्रम करणाऱ्या प्रणव धनावडेच्या अचाट कामगिरीने कल्याणकरांचे क्रिकेट स्टेडियमचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.
ठाणे जिल्हा नियोजन
समितीच्या बैठकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रणवसह
त्याच्या आईवडिलांचा सत्कार केला. याप्रसंगी त्यांनी डोंबिवलीप्रमाणेच कल्याणमध्ये खेळांडूना खेळण्यासाठी स्टेडियम बांधण्यासाठी चर्चा करून महापालिकेला पुढाकार घेण्याचे सांगितले.
या स्टेडियमसाठी किती खर्च अपेक्षित आहे, याविषयी त्यांना विचारणा केली असता केडीएमसीने यासंदर्भात लवकरच प्रस्ताव सादर केल्यास खर्चाचे नियोजन करणार असल्याचे सूतोवाच त्यांनी पत्रकारांशी बोलताना केले. तत्पूर्वी त्यांनी नियोजन भवनमध्ये डीपीसीची बैठक सुरू होताच सभागृहात उपस्थित असलेल्या प्रणवसह त्याच्या आईवडिलांचा सत्कार करून त्याला क्रिकेट किट भेट दिले.
धनावडे गरीब घरातील आहे. तरीदेखील तो मुंबईला जाऊन सराव करतो. त्याच्या विश्वविक्रमाने देशाची मान उंचावली आहे. खेळण्यासाठी कल्याणमध्ये मैदान नसणे दुर्दैवाची बाब आहे.
महापालिकेने पुढाकार घेऊन कल्याण पूर्वच्या चक्की नाका येथे स्टेडियम विकसित करण्याच्या
सूचना खासदार डॉ. श्रीकांत
शिंदे यांनी सभागृहात उपस्थित असलेले केडीएमसीचे उपायुक्त संजय घरत यांना दिल्या. त्यांनीही तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन दिल्यामुळे कल्याणकरांना आता लवकरच हक्काचे स्टेडियम मिळणार, यात शंका नाही.
‘मास्टर’ भेट! प्रणवला ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरकने बॅट भेट म्हणून दिली. सचिनने आपली स्वाक्षरी केलेली बॅट प्रणवला देताना ‘असाच खेळत राहा.. आणखी मेहनत कर, खेळाचा आनंद घे’ असा संदेशही दिला.
एअर इंडियाची आॅफर! प्रणवची सर्वच स्तरातून दखल घेतली जात असताना एअर इंडियानेही थेट त्याला आपल्या संघातून खेळण्याची आॅफर दिली आहे. एअर इंडियाच्या एका अधिकारीने सांगितले की, आम्ही प्रणवच्या पालकांना याबाबतीत बुधवारीच कल्पना दिली होती. स्कॉलरशीपच्या आधारे आम्ही त्याला एअर इंडियात सहभागी होण्यास सांगितले आहे.